Lucknow Super Giants, IPL 2022 : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा शुभारंभ 26 मार्च 2022 रोजी होत आहे. पण आयपीएलमधील सर्वात महागडा लखनौ सुपर जायंट्स संघ 28 मार्चपासून मैदानात उतरणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगमात दोन नवीन संघ जोडले आहेत, त्यापैकीच एक लखनौ संघ आहे.  आयपीएलच्या मेगा लिलावात लखनौ संघाने एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंना विकत घेतलं आहे. त्यामुळे पहिल्याच स्पर्धेत लखनौचा संघ विजयाचा दावेदार म्हणून समोर आला आहे. के.एल. राहुलकडे लखनौ संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर लखनौ संघाचा मेंटॉर दोन वेळचा आयपीएल विजेता गौतम गंभीर आहे. गौतम गंभीरचा अनुभव लिलावावेळी पाहायला मिळाला. गौतम गंभीरच्या नेतृत्वात ऑक्शनमध्ये लखनौ संघाने दर्जेदार खेळाडूंचा भरणा उभा केला आहे.  
 
लखनौ संघाकडे के.एल राहुलसारखा चॅम्पियन फलंदाज आहे. त्यासोबत क्विंटन डिकॉकसारखा अनुभवी विकेटकीपर आणि विस्फोटक ओपनर आहे. वेगवान गोलंदाजी आणि अष्टपैलूंचं मिश्रणही या संघामध्ये आहे. त्यामुळे संघ पूर्णपणे संतुलीत वाटतोय. त्यामुळे पहिल्याच हंगामात लखनौ संघ विजेता झाला तर आश्चर्य वाटायला नको. पाहूयात लखनौ संघाती ताकद, कमजोरी आणि एक्स फॅक्टर काय आहे... 


ताकद -
लखनौ संघाची ताकद फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहे.  लखनौ संघाची गोलंदाजीही दर्जेदार आहे. लखनौ संघाकडे अनुभवी आणि दर्जेदार भारतीय खेळाडूंची फौज आहे. या खेळाडूंकडे कठीण परिस्थितीत संघाला विजय मिळवून देण्याचं कौशल्य आहे. राहुल आणि क्विंटन डिकॉकसारखे विस्फोटक ओपनर आहेत. एविन लुईस हा सलामीसाठी आणखी एक पर्याय आहे. मनिष पांडे, दीपक हुड्डा यासारखे मध्यक्रम फलंदाज आहेत. तर मार्कस स्टोयनिस, जेसन होल्डर, क्रुणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम, कायल मेयर्स यासारखे दर्जेदार अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे संघ अधिक संतुलीत वाटतोय.  


कमकुवत बाजू – 
लखनौच्या चमूमध्ये एकापेक्षा एक दर्जेदर गोलंदाज आहेत.  आवेश खान, शाहबाज नदीम, दुष्मंता चमीरा यासारखे गोलंदाज आहेत. त्याशिवाय रवी बिश्नोईसारखा फिरकी गोलंदाज आहे. मात्र, लखनौ संघाची गोलंदाजीच काही प्रमाणात कमकुवत बाजू असल्याचे दिसतेय. लखनौ संघातील गोलंदाज दर्जेदार आहेत, पण त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता असल्याचे दिसतेय. मार्क वुड दुखापतग्रस्त झाल्यानंतर लखनौ संघाची वेगवान गोलंदाजी थोडीफार कमकुवत दिसतेय.  


एक्स फॅक्टर काय?
आयपीएलच्या दोन हंगामात के.एल. राहुलने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. राहुलचा हाच फॉर्म संघासाठी ट्रम्पकार्ड होऊ शकतो.  क्विंटन डिकॉकही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रवी बिश्नोई आणि मार्कस स्टोयनिसही लखनौसाठी मॅच विनर ठरु शकतात.  


कसा आहे लखनौ संघ ?
केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, जेसन होल्डर, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, आवेश खान, अंकित राजपूत, कृष्णप्पा गौतम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मनन खान, आयुष बधोनी, काइल मायर्स, कर्ण शर्मा, एविन लुईस, मयंक यादव आणि बी साई सुदर्शन.