LSG vs RR : कर्णधार केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांच्या अर्धशतकाच्या बळावर लखनौनं निर्धारित 20 षटकांत 5 विकेटच्या मोबदल्यात 196 धावांपर्यंत मजल मारली. राहुलनं 76 तर हुड्डाने 50 धावांची खेळी केली. राजस्थानकडून संदीप शर्मानं दोन विकेट घेतल्या. राजस्थानला विजयासाठी 197 धावांची गरज आहे. 


लखनौची खराब सुरुवात 


नाणेफेक गमावल्यानंतर लखनौच्या संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण ट्रेंट बोल्टनं पहिल्याच षटकात लखनौला धक्का दिला. फॉर्मात असलेल्या क्विंटन डि कॉकची दांडी उडवत बोल्टनं तंबूत पाठवलं. डी कॉकने तीन चेंडूमध्ये आठ धावा चोपल्या. मागील सामन्यातील शतकवीर मार्कस स्टॉयनिस आज गोल्डन डकचा शिकार झाला. मार्कसला एकही धाव काढता आली नाही. दोन विकेट झटपट पडल्यानंतर केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांनी डावाला आकार दिला. राहुल-हुड्डा यांनी लखनौचा डाव सावरला. 


राहुल-हुड्डा यांनी डाव सावरला 


केएल राहुल यानं एका बाजूनं संयमी फलंदाजी केली, तर दुसऱ्या बाजूला दीपक हुड्डानं आक्रमक फलंदाजी केली. दीपक हुड्डाने 31 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्यानं सात चौकार ठोकले. दीपक हुड्डाने 162 च्या स्ट्राईक रेटने राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली. केएल राहुल यानं कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. केएल राहुलने 48 चेंडूमध्ये 76 धावांची खेळी केली. केएल राहुल यानं दोन षटकार आणि आठ चौकारांचा पाऊस पाडला. लखनौच्या फलंदाजांना फक्त दोन षटकार ठोकता आले, ते दोन्ही षटकार केएल राहुल यानेच मारले. 


निकोलस पूरन याला आज मोठी खेळी करता आली नाही. संथ खेळपट्टीवर धावा जमवण्यात निकोलस पूरन याला अपयश आले. निकोलस पूरन यानं 11 चेंडूमध्ये एका चौकाराच्या मदतीने 11 धावा केल्या. आयुष बडोनी आणि कृणाल पांड्यानं अखेरच्या षटकात फटकेबाजी करत लखनौची धावसंख्या वाढवली. आयुष बडोनी यानं 13 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिले. तर कृणाल पांड्याने 11 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दिलं. 


राजस्थानची गोलंदाजी कशी राहिली ? - 


लखनौच्या फलंदाजांसमोर राजस्थानकडून भेदक गोलंदाजी करण्यात आली. संदीप शर्मा यानं चार षटकात 31 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. युजवेंद्र चहल याला एकही विकेट मिळाली नाही, त्यानं 41 धावा खर्च केल्या. अश्विन, बोल्ट आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.


राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 


राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल


इम्पॅक्ट प्लेअर्स – रियान पराग, शुभम दुबे, नवदीप सैनी, टॉम कोहलर-कॅडमोर, तनुष कोटियन


लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर


इम्पॅक्ट प्लेअर्स – अमित मिश्रा, अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौथम, युधवीर सिंग चरक, मणिमरण सिद्धार्थ