Virat Kohli IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला अवघे 8 दिवस शिल्लक आहे. आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. कारण, विराट कोहली दोन महिन्यानंतर मैदानावर परतणार आहे. विराट कोहलीचा हा आयपीएलचा 17 वा हंगाम असेल. आयपीएल 2024 च्या हंगामात विराट कोहलीच्या नावावर आगळावेगळा विक्रम जमा होणार आहे. एकाच संघाकडून 17 हंगाम खेळणारा विराट हा एकमेव खेळाडू असेल. आयपीएलच्या रनसंग्रामाला 2008 मध्ये सुरुवात झाली, तेव्हापासून विराट कोहली आरसीबीच्या संघाचा सदस्य आहे. 2008 मध्ये आरसीबीने विराट कोहलीला 12 लाख रुपयांत खरेदी केले होते. तेव्हापासून विराट कोहली आरसीबीचा महत्वाचा सदस्य आहे. विराट कोहलीनं आरसीबीचं कर्णधारपदही संभाळलं आहे. आयपीएलचे 17 हंगाम एकाच संघाकडून खेळण्याचा विक्रम फक्त विराट कोहलीच्या नावावर आहे, भविष्यातही हा विक्रम मोडण्याची शक्यता कमीच आहे.
आयपीएलचा पहिला हंगाम खेळणारे काही मोजके खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्येही सहभागी असतील. त्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, एमएस धोनी आणि मनिष पांडे यांचा समावेश आहे. यामध्ये फक्त विराट कोहलीच एकाच संघाकडून खेळलाय. आरसीबीने नुकतीच विराट कोहलीच्या 16 वर्षांनिमित्त खास पोस्ट केली होती. एमएस धोनी चेन्नईशिवाय पुणे संघाकडून खेळला आहे. रोहित शर्मा सुरुवातीली डेक्कन चार्जस संघाकडून खेळत होता. दिनेश कार्तिक आणि मनिष पांडे यांनी तर पाच ते सहा संघाकडून आयपीएलमध्ये खेळले आहेत. आयपीएलच्या इतिहासात एकाच संघाकडून खेळण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.
विराट कोहली यंदा आरसीबीला चषक उंचावून देणार का?
विराट कोहली आणि आरसीबी... हे एक समीकरणच आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठी विराट कोहली आरसीबीचा सदस्य आहे. विराट कोहली आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात फक्त एका धावेवर बाद झाला.. पण त्यानंतर त्यानं इतिहास रचला. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने 237 सामन्यात 7263 धावांचा पाऊस पाडलाय. त्यामध्ये सात शतकं आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीनं आयपीएलमध्ये चार विकेटही घेतल्या आहेत. विराट कोहली एकहाती सामना फिरवू शकतो. आरसीबीची सर्वात मोठी ताकद विराट कोहलीच आहे. यंदा आरसीबीला चषक मिळवून देण्यासाठी विराट कोहली जिवाचं रान करु शकतो.
2008 ते 2024.... आरसीबीकडून विराट कोहलीला प्रत्येक वर्षी किती पगार मिळतोय ?