Royal Challengers Bangalore : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना चेन्नई आणि आरसीबी या दोन संघामध्ये होणार आहे. मागील 16 वर्षांत आरसीबीला एकदाही चषकावर नाव कोरता आले नाही. पहिल्या हंगामापासून आरसीबीकडे दिग्गज खेळाडूंचा भरणा होता, पण त्यांना चषकावर नाव कोरण्यात यश मिळालं नाही. प्रत्येक आयपीएल स्पर्धेआधी आरसीबीकडे जेतेपदाचा दावेदार म्हणून पाहिलं जातं, पण त्यांना चषकावर नाव कोरता येत नाही. आरसीबीचा संघ यंदा तरी चषकावर नाव कोरणार का? याची चाहत्यांना उत्कंठा लागली आहे. आरसीबीची प्रमुख ताकद फलंदाजी आहे, तीन फलंदाज आरसीबीला चषक मिळवून देऊ शकतात, हीच संघाची सर्वात मोठी तादक आहे. पाहूयात त्या तीन फलंदाजांबद्दल....



विराट कोहली -


विराट कोहली आणि आरसीबी... हे एक समीकरणच आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठी विराट कोहली आरसीबीचा सदस्य आहे. विराट कोहली आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात फक्त एका धावेवर बाद झाला.. पण त्यानंतर त्यानं इतिहास रचला. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने 237 सामन्यात 7263 धावांचा पाऊस पाडलाय. त्यामध्ये सात शतकं आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीनं आयपीएलमध्ये चार विकेटही घेतल्या आहेत. विराट कोहली एकहाती सामना फिरवू शकतो. आरसीबीची सर्वात मोठी ताकद विराट कोहलीच आहे. यंदा आरसीबीला चषक मिळवून देण्यासाठी विराट कोहली जिवाचं रान करु शकतो. 


ग्लेन मॅक्सवेल -


ग्लेन मॅक्सवेल याला विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखलं जातं. टी 20 सारख्या मॉर्डन क्रिकेटमध्ये ग्लेन मॅक्सवेल यानं चौकार आणि षटकारांचा पाऊस मारत सर्वांची मनं जिंकली आहे. आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल यानं 18 अर्धशतकं ठोकली आहे. त्यानं 124 सामन्यात 2719 धावा चोपल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंक्या 95 इतकी आहे. ग्लेन मॅक्सवेल कोणत्याही गोलंदाजांचा चुराडा करु शकतो. मॅक्सवेल गोलंदाजीतही योगदान देतो, त्याच्या नावावर 31 विकेट आहेत. मॅक्सवेल आरसीबीची ताकद आहे, तो मध्यक्रम संभाळू शकतो. तो कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतो. 


फाफ डु प्लेसिस -


डु प्लेसिस याचा अनुभव आरीसीबीसाठी फायद्याचा ठरु शकतो. फाफने अनेक संघाकडून आयपीएल सामने खेळले आहेत. तो सध्या आरसीबीची धुरा संभाळत आहे. सलामीला येऊन वेगवान सुरुवात करुन देण्याची जबाबदारी फाफ डु प्लेसिस याच्यावर असेल. त्याने 130 सामन्यात 4133 धावा केल्यात. यामध्ये 33 अर्धशतके ठोकली आहेत. 


आरसीबी - फाफ डु प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार विशाक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉपले, हिमांशु शर्मा, राजन कुमार, कॅमरून ग्रीन, अल्ज़ारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरेन, लॉकी फर्ग्यूसन, स्वप्निल सिंह, सौरव चौहान.