Most Experience Captain IPL 2024: कॅप्टन कूल एमएस धोनीनं आज चेन्नईचं कर्णधारपद सोडलं. सीएसकेची धुरा युवा ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर सोपवण्यात आली. सीएसके आणि बीसीसीआयकडून याबाबतची घोषणा करण्यात आली. आयपीएल 2024 आधी होणाऱ्या फोटोशूटसाठी चेन्नईकडून धोनीऐवजी ऋतुराज गायकवाड पोहचला होता. त्यानंतर धोनीनं कर्णधारपद सोडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. 2024 मध्ये धोनी फक्त खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याकडेही कर्णधारपदाची धुरा नसेल. त्यामुळे तीन धुरंधर पहिल्यांदाच फक्त खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहेत. पण यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात अनुभवी कर्णधार कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मराठमोळा ऋतुराज गायकवाड यंदाच्या हंगामातील सर्वात अनुभवी कर्णधार असेल.. पाहूयात आकडे अन् सविस्तर माहिती


रोहित शर्मा आणि विराट कोहलीही कर्णधार नाहीत - 


एमएस धोनीशिवाय भारतीय क्रिकेटमधील दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहलीही फक्त खेळाडू म्हणून यंदा मैदानात उतरतील. 2021 च्या आयपीएल हंगामानंतर विराट कोहलीनं आरसीबीचं कर्णधारपद सोडलं होत. गेल्या हंगामात फाफ दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्यानं नेतृत्व संभाळलं होतं. त्याशिवाय रोहित शर्माही यंदा कर्णधार नसेल. आयपीएल 2024 आधी मुंबईने हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. 


पहिल्यांदाच तिघांपैकी कुणीही कर्णधार नसेल - 


2008 मध्ये आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली. पहिल्याच हंगामात धोनीनं चेन्नईचं नेतृत्व संभाळलं होतं. 2012 मध्ये विराट कोहलीला आरसीबीचं कर्णधारपद मिळालं. 2013 मध्ये रोहित शर्माला मुंबईनं कर्णधार केले. 2017 मध्ये धोनी आयपीएलमध्ये कर्णधार नव्हता, पण रोहित आणि विराट यांच्याकडे धुरा होती. 2022 च्या सुरुवातीला विराट आणि धोनी कर्णधार नव्हते, पण रोहित शर्मा कर्णधार होता. पण आयपीएलमध्ये पहिल्यांदाच हे तिन्ही खेळाडू एकाचवेळी फक्त खेळाडू म्हणून मैदानात उतरतील.  


श्रेयस अय्यर  सर्वात अनुभवी कर्णधार -


धोनीनं कर्णधारपद सोडल्यानंतर मराठमोळा श्रेयस अय्यर यंदाच्या हंगामातील सर्वात अनुभवी कर्णधार असेल. श्रेयस अय्यरनं आतापर्यंत आयपीएलमध्ये 55 सामन्यात नेतृत्व केले आहे. केएल राहुल यानं 51 सामन्यात कर्णधारपद भूषावलं आहे. संजू सॅमसन 45 सामन्यात कर्णधार राहिलाय. आयपीएलमधील सर्व 10 कर्णधारांचा 261 सामन्याचा अनुभव आहे. शुभमन गिल, पॅट कमिन्स आणि ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद भूषावत आहेत. 


यंदाच्या हंगामात कोणत्या संघाची धुरा कोण संभाळणार ?


चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड
Chennai Super Kings: Ruturaj Gaikwad


दिल्ली कॅपिटल्स - ऋषभ पंत
Delhi Capitals: Rishabh Pant


गुजरात टायटन्स - शुभमन गिल
Gujarat Titans: Shubman Gill


कोलकाता नाईट रायडर्स - श्रेयस अय्यर
Kolkata Knight Riders: Shreyas Iyer


लखनौ सुपर जायंट्स - केएल राहुल
Lucknow Super Giants: KL Rahul


मुंबई इंडियन्स - हार्दिक पांड्या
Mumbai Indians: Hardik Pandya


पंजाब किंग्स - शिखर धवन
Punjab Kings: Shikhar Dhawan


राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन
Rajasthan Royals: Sanju Samson


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - फाफ डु प्लेसिस
Royal Challengers Bangalore: Faf du Plessis


सनरायजर्स हैदराबाद - पॅट कमिन्स
Sunrisers Hyderabad: Pat Cummins