लखनौ : आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमने सामने येणार आहेत. या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू केएल राहुलच्या कामगिरीकडे लक्ष असेल. कारण, केएल राहुलनं यापूर्वी लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्त्व केलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय. केए राहुलनं यापूर्वी तीन हंगामात लखनौचं नेतृत्त्व केलं आहे. यापैकी दोन हंगामात लखनौनं प्लेऑफ पर्यंत धडक दिली होती. मात्र, 2024 च्या आयपीएलमध्ये लखनौची कागमिरी समाधानकारक न झाल्यानं लखनौनं केएल राहुलला रिलीज केलं होतं.
केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सनं मेगा ऑक्शनमध्ये 14 कोटी रुपयांना संघात घेतलं होतं. यंदाचं आयपीएल केएल राहुलसाठी लकी ठरलं आहे. राहुलनं 6 मॅचमध्ये 53.20 च्या सरासरीनं 266 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यानं दोन अर्धशतकं केली आहेत. या मॅचपूर्वी चेतेश्वर पुजारानं महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
राहुल लखनौ विरुद्ध चांगली कामगिरी करेल
व्यावसायिक क्रिकेटर म्हणून मला वाटतं की तुम्ही जे घडलं ते विसरुन पुढं जायला हवं. मात्र, या गोष्टी तुमच्या मनात असतात, त्यामुळं केएल राहुलच्या मनात लखनौ विरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा विचार असेल. याशिवाय केएल राहुल अधिक विचार करत नसेल, असं ही चेतेश्वर पुजारा म्हणाला.
केएल राहुल या हंगामात वेगळ्याचं मनस्थितीत दिसत असून त्याचा फलंदाजीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं. राहुलवर अधिक दडपणाचा दबाव नसून त्याला दिल्लीकडून खेळताना अधिक स्वातंत्र्य मिळतंय, असं चेतेश्वर पुजारानं म्हटलं.
केएल राहुलला दिल्लीच्या संघात अधिक स्वातंत्र्य मिळत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीमुळं केएल राहुलला आत्मविश्वास मिळाला आहे. तो कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मध्ये चांगली कामगिरी करत आहे. केएल राहुल यापूर्वी अनेक गोष्टींचं दडपण घेऊन खेळत होता, आता मात्र ते त्यानं झुगारुन दिलं आहे, असं देखील पुजारा म्हणाला. केएल राहुल मानसिक रित्या देखील अधिक संतुलित दिसत असल्याचं म्हटलं. केएल राहुल यापूर्वी बाहेर सुरु असणाऱ्या अनेक गोष्टींचा विचार करायचा, आता तो त्याचा विचार करत नसावा, असं देखील चेतेश्वर पुजारानं म्हटलं.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत केएल राहुलनं दमदार कामगिरी केलीहोती. मधल्या फळीत खेळताना केएल राहुलनं चार डावात 140 धावा केल्या. केएल राहुलनं तोच फॉर्म आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना कायम ठेवलाय, लखनौ विरुद्ध खेळायला तो उत्सुक असेल, असं चेतेश्वर पुजारानं म्हटलं.