KL Rahul Injury Health Update : इंडियन प्रीमियर लीग 2024 (Indian Premier League) चा रणसंग्राम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. क्रिकेट प्रेमींना आता आयपीएलचं (IPL 2024) वेध लागलं आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी सर्व संघाची जोरदार तयारी सुरु आहे. काही खेळाडू दुखापतीमुळे यंदाची आयपीएल मुकणार आहेत, तर काहींच्या तब्येतीबाबत अद्याप स्षष्ट माहिती समोर आलेली नाही. अशात लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघासाठी मोठी आणि चांगली बातमी समोर आली आहे. केएल राहुलच्या (KL Rahul) तब्येतीबाबत (Health Update) मोठी अपडेट समोर आली आहे.


केएल राहुल मैदानावर परतणार


लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज केएल राहुल गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीतून सावरत आहे. आता त्यांच्या तब्येतीबाबत सकारात्मक माहिती समोर आली आहे. केएल राहुल आगामी आयपीएल हंगामासाठी फिट असल्याची माहिती राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) दिली आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामाला केएल राहुल मुकणार नाही, तर तो मैदानात खेळताना दिसणार आहे. ही चाहत्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. 






आयपीएल आधी केएल राहुलच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट


गेल्या आयपीएलच्या हंगामात सामन्यादरम्यान केएल राहुलला दुखापत झाली होती. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. केएल राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आणि ते लंडनमध्ये उपचार घेत होता. इंग्लंडविरोधातील अखेरच्या कसोटी सामन्यालाही केएल राहुल (KL Rahul) मुकला होता. इंग्लंडविरोधात केएल राहुल खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण, तो फिट नसल्याचं नंतर समोर आलं. आता NCAने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, केएल राहुल आयपीएल खेळण्यासाठी फिट असल्याचं सांगितलं आहे.  


लखनौ संघासाठी खूशखबर


केएल राहुलला इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी NCA ने तंदुरुस्त घोषित केलं आहे. केएल राहुलला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) फिटनेस प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळे तो आता आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. पुढील एक-दोन दिवसांत तो संघात सामील होईल. लखनौ सुपर जायंट्स यंदाच्या आयपीएल मोहिमेची सुरुवात रविवारी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.


विकेटकिपिंग न करण्याचा सल्ला


बीसीसीआयच्या वैद्यकीय संघाने केएल राहुलला आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात विकेटकिपिंग न करण्याचा सल्ला दिला आहे. आयपीएलच्या सुरुवातीचे काही सामने केएल राहुलने फक्त फलंदाज म्हणून खेळण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुल तंदुरुस्त आहे आणि येत्या काही दिवसांत तो लखनौ संघात सामील होईल. त्याला सध्या विकेटकीपिंग न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.