Kolkata vs Hyderabad: इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेलेल्या आयपीएल 2021 च्या 49 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सहा गडी राखून पराभव केला. हैदराबादने पहिल्यादा खेळत 20 षटकांत 8 बाद 115 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल केकेआरने शेवटच्या षटकात चार गडी गमावून विजय मिळवला. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
कोलकाताचा 13 सामन्यांतील हा सहावा विजय आहे. गुणतालिकेत तो चौथ्या स्थानावर आहे. तथापि, प्लेऑफसाठी पात्र होणे त्याच्यासाठी सोपे होणार नाही, कारण राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स देखील या शर्यतीत सहभागी आहेत. मात्र, केकेआरचा नेट रन रेट मुंबई आणि राजस्थानपेक्षा खूपच चांगला आहे.
केकेआरला मिळाला सहज विजय
प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी केकेआरला हा सामना कोणत्याही किमतीत जिंकावा लागणार होता. मात्र, त्याच्या गोलंदाजांनी हे काम आणखी सोपे केले. केकेआरच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड ठेवली आणि हैदराबादला फक्त 115 धावांवर रोखले. यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या केकेआरने व्यंकटेश अय्यर 08 आणि राहुल त्रिपाठी 07 च्या विकेट गमावल्या, पण यानंतर शुभमन गिल आणि नितीश राणा यांनी 55 धावांची भागीदारी करत विजय निश्चित केला.
गिलने 51 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी नितीश राणाने 33 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. त्याचवेळी दिनेश कार्तिक 12 चेंडूत 18 धावांवर नाबाद परतला आणि कर्णधार इऑन मॉर्गनने दोन चेंडूत दोन धावा केल्या. कार्तिकने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
हैदराबादचे फलंदाज पुन्हा एकदा फ्लॉप
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात रिद्धीमान साहा खाते न उघडता बाद झाला. यानंतर, केकेआरच्या गोलंदाजांनी अचूक लाईन लेंथसह गोलंदाजी केली आणि केन विल्यमसन आणि जेसन रॉय यांना जखडून ठेवलं. चौथ्या षटकात रॉय अवघ्या 16 धावांवर बाद झाला. त्याने 13 चेंडूत 10 धावा केल्या. यानंतर कर्णधार केन विल्यमसन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 21 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. काही वेळातच अभिषेक शर्मा सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
51 धावांवर चार गडी बाद झाल्यानंतर अब्दुल समद आणि प्रियम गर्ग यांनी हैदराबादचा डाव पुढे नेला. पण दोघांनाही वेगाने धावा करता आल्या नाहीत. गर्ग 31 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 21 धावांवर बाद झाला. षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो सीमारेषेवर झेल बाद झाला. यानंतर समदने तीन षटकार ठोकले, पण त्यालाही 18 चेंडूत फक्त 25 धावा करता आल्या. याशिवाय राशिद खानने 08 आणि जेसन होल्डरने 02 धावा केल्या. सरतेशेवटी, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल 7-7 धावांवर नाबाद परतले.
केकेआरसाठी, मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याच्या चार षटकांत फक्त 29 धावा देऊन दोन बळी घेतले. त्याचबरोबर टीम साऊदीने 26 धावांत दोन गडी बाद केले आणि शिवम मावीने 29 धावांत दोन बळी मिळवले. तसेच शाकिब अल हसनला एक विकेट मिळाली.