KKR vs RCB : IPL मध्ये बुधवारी रात्री झालेल्या रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्यात दोन्ही संघाकडून गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण अखेर आरसीबी तीन विकेट्सनी विजयी झाली. नवी मुंबईच्या  डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात केकेआरवर आरसीबीने निसटता विजय मिळवला असून या सामन्यानंतर पराभूत संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने मात्र संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे.


श्रेयस अय्यरने सामन्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत तो म्हणाला की,'मला वाटतं सामना अत्यंत चुरशीचा झाला. सामन्यापूर्वीच मी हा सामना अत्यंत अवघड असून आपली परीक्षा घेणारा असेल असं मी आधीच सहकाऱ्यांना सांगितलं होतं. दरम्यान आम्ही 129 इतकं छोटं टार्गेट असतानाही शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना घेऊन गेलो यामुळे मला संघाच्या खेळीवर गर्व आहे.' श्रेयसने आरसीबीकडून वानिंदूने केलेली गोलंदाजी उल्लेखणीय असल्याचंही म्हणाला.


असा पार पडला सामना


नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या कोलकाता संघाची खराब सुरुवात झाली. कोलकात्याचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य राहणेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अवघ्या 10 धावांवर असताना व्यंकटेश अय्यरनं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेही (9 धावा) बाद झाला. मात्र, त्यानंतर हसरंगानं त्याची जादू दाखवायला सुरुवात केली. त्याने श्रेयस अय्यरला अवघ्या 13 धावांवर माघारी धाडलं. त्यापाठोपाठ हसरंगानं लगेच जॅक्सनला बोल्ड केलं. त्यानंतर हसरंगानं पुन्हा एकदा आपली जादू दाखवत टीम साउथीनं अवघी एक धाव केलेली असताना त्याला बाद केलं. ज्यामुळं कोलकात्याच्या संघाला 20 षटकात सर्वबाद 128 धावापर्यंत मजल मारता आली. आरसीबीकडून वानिंदु हसरंगानं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, आकाश दीपनं तीन विकेट्स प्राप्त केल्या. हर्षल पटेलनं दोन तर, मोहम्मद सिराजनं एक विकेट्स घेतली.


129 धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाची दमछाक होताना दिसली. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (5 धावा) आणि अनूज रावत (0 धावा) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहली आणि डेव्हिड व्हिलीलाही चांगली कामगिरी करता आली नाही. विराटनं 7 चेंडूत 12 धावा केल्या. तर, व्हिलीनं 28 चेंडूत 18 धावा केल्या. आरसीबीकडून सर्फेन रदरफोर्डनं सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. परंतु, टीम साऊथीनं 16 व्या षटकात त्याला बाद केलं. त्यानंतर मैदानात आलेला शाहबाज अहमद 27 धावा करून बाद झाला. आरसीबीनं सात विकेट्स गमावले असताना फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वानिंदु हसरंगालाही टीम साऊथीनं माघारी धाडलं. सामना कोलकात्याच्या बाजूला झुकलाय असं दिसत असताना दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेलनं फटकेबाजी करत आरसीबीला तीन विकेट्सने विजय मिळवून दिला. कोलकात्याकडून टीम साऊथीनं सर्वाधिक तीन विकेट्स मिळवल्या. तर, उमेश यादवनं दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, सुनिल नारायण आणि वरूण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


हे देखील वाचा-