IPL 2022, GT vs LSG : राहुल तेवातियाच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर गुजरातने पाच गड्यांनी लखनौवर विजय मिळवला. राहुल तेवातियाने 24 चेंडूत 40 धावांची विस्फोटक खेळी केली.  या खेळीदरम्यान राहुलने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. हार्दिक पांड्या, मॅथ्यू वेड आणि डेविड मिलर यांच्या छोटेखानी खेळीला राहुल तेवातियाच्या विस्फोटक खेळीची जोड मिळाली. त्याबळावर गुजरातने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. लखनौ संघाची आयपीएलची सुरुवात निराशाजनक झाली आहे.


लखनौने दिलेल्या 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना  गुजरातची सुरुवात खराब झाली होती. सलामी फलंदाज शुभमन गिल शुन्य धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर आलेला विजय शंकरही सहा धावा काढून माघारी परतला. मॅथ्यू वेड आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला पण मोक्याच्या क्षणी दोघेही बाद झाले. हार्दिक पांड्या 33 आणि मॅथ्यू वेडने 30 धावा केल्या. मिलर आणि राहुलने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी भागिदारी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर आवेश खानने मोक्याच्या क्षणी मिलरला बाद केले. मिलरने 30 धावांची खेळी केली. त्यानंतर राहुल तेवातिया आणि युवा अभिनव मनोहर यांनी गुजरतला विजय मिळवून दिला. लखनौकडून दुषंता चमिराने  सर्वाधिक दोन विकेट घेतल्या तर आवेश खान, क्रृणाल पांड्या, दीपक हुड्डा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.


दरम्यान, अष्टपैलू दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावार लखनौ संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्य. मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यानंतर लखनौ संघाचा डाव कोसळला होता. आघाडीची फळी कोसळल्यानंतर दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावार लखनौ संघाने सन्माजनक धावसंख्या उभारली. दीपक हुड्डाने आपल्या अर्धशतकी खेळीत 2 षटकार आणि सहा चौकार चोपले. तर आयुष बडोनी याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. बडोनीने 41 चेंडूत ताबडतोड 54 धावांची खेळी केली.  गुजरातकडून शमी सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. शमीने तीन विकेट घेतल्या. तर वरुण वरुण अरोन याने दोन विकेट घेतल्या. तर  राशिद खानला एक विकेट मिळाली.  हार्दिक पांड्या आणि लॉकी फर्गुसन यांची विकेटची पाटी कोरीच राहिली.


लखनौची आघाडीची फळी कोलमडली –
गुजरात संघाच्या भेदक माऱ्यापुढे लखनौ संघाची आघाडीची फळी कोलमडली. कर्णधार राहुलला खातेही उघडता आले नाही.  तर डिकॉक सात धावा काढून माघारी परतला. लुईसने 10 तर मनिष पांडे अवघ्या सहा धावा काढून बाद झाले. आघाडीच्या एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही.


दीपक हुड्डा आयुष बडोनी यांची खेळी व्यर्थ –
आघाडी फळी कोलमडल्यानंतर अष्टपैलू दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांनी लखनौचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 68 चेंडूत 87 धावांची भागिदारी केली. दीपक हुड्डाने 41 चेंडूत 55 धावांची खेळी केली. तर आयुष बडोनी यानेही दणक्यात पदार्पण केले. आयुषने पदार्पणाच्या सामन्यात दबावाखाली खणखणीत अर्धशतक झळकावले. आयुषने अवघ्या 38 चेंडूत 54 धावांची खेळी केली.  


 शमीचा भेदक मारा –
मोहम्मद शामीच्या भेदक माऱ्यामुळे बलाढ्या लखनौची फलंदाजी कोलमडली. शामीने पहिल्याच चेंडूवर कर्णधार के. राहुलला बाद करत लखनौला पहिला धक्का दिला. त्यातून लखनौचा संघ सावरलाच नाही. त्यानंतर शमीने डि कॉक आणि मनिष पांडे यांनाही बाद करत लखनौची आघाडी फळी मोडून काढली. मोहम्मद शमीने चार षटकात 29 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट घेतल्या.


 हार्दिकची गोलंदाजी –
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली. मागील काही दिवसांपासून हार्दिकच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होता. टी20 विश्वचषकानंतर हार्दिकला टीम इंडियातही स्थान मिळाले नव्हते. दुखापतीनंतर हार्दिक पांड्याने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. हार्दिकने चार षटके गोलंदाजी केली. चार षटकांत हार्दिकला एकही विकेट मिळाली नाही. हार्दिकने चार षटकांत 37 धावा दिल्या