Shreyas Iyer, IPL 2024 : आयपीएलला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत, पण त्याआधीच कोलकात्याला मोठा धक्का बसला आहे. रणजी सामन्यादरम्यान कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर याची दुखापत बळावली आहे. रणजी चषकाच्या फायनल सामन्यावेळी श्रेयस अय्यरची पाठदुखी पुन्हा बळावली आहे. पाठदुखीमुळे श्रेयस अय्यर सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या रणजी चषकाच्या फायनलमध्ये मुंबईने विदर्भाचा धुव्वा उडवला.  या सामन्यातील दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरने शानदार खेळी केली होती. अय्यरने 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 95 धावांचा पाऊस पाडला. पण त्यानंतर त्याला पाठदुखीचा त्रास सुरु झाला. श्रेयस अय्यर सुरुवातीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे, तसं झाल्यास हा कोलकात्यासाठी मोठा धक्का असेल. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणजी चषकाच्या फायनल सामन्यात दुसऱ्या डावात अय्यरनं शानदार फलंदाजी केली, पण तेथूनच त्याची पाठदुखी बळावली. आयपीएल सुरु होण्यासाठी आता फक्त दहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलाय. अशा स्थितीत कोलकात्याच्या अडचणी वाढल्या आहेत. श्रेयस अय्यर मागील आयपीएल हंगामही दुखापतीमुळे मुकला होता. आताही पुन्हा एकदा त्याची दुखापत बळावली आहे, त्यामुळे सुरुवातीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. 


सामन्यादरम्यान रुग्णालयात पोहचला अय्यर - 


रिपोर्ट्सनुसार, रणजी चषकाच्या फायनल सामन्यातील चौथा दिवसाचा खेळ सुरु असताना श्रेयस अय्यर स्कॅनिंगसाठी रुग्णालयात गेला होता. फलंदाजी करत असतानाही त्याला पाठदुखीचा त्रास जाणवत होता. मुंबईच्या फिजिओनं ट्रिटमेंट केले होते. अय्यरला जुन्याच पाठदुखीनं पुन्हा गाढलेय, गेल्यावर्षी त्याच्यावर सर्जरी झाली होती. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात श्रेयस अय्यर खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याला इंग्लंडविरोधातील मालिकेत पाठदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याला समस्या जाणवू लागली आहे. 


इंग्लंडविरोधात दुखापत -


इंग्लंडविरोधात पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी श्रेयस अय्यर याला संघात स्थान मिळालं होतं. कसोटी मालिकेत श्रेयस अय्यरनं पाठदुखीचा त्रास होत असल्याचं फिजिओला सांगितलं होतं. त्यात त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.