अहमदाबाद : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यामध्ये एलिमिनेटरची लढत झाली. या लढतीत राजस्थान रॉयल्सनं बंगळुरुला पराभूत केलं. राजस्थान रॉयल्सनं पहिल्यांदा आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 172 धावांमध्ये रोखण्यात यश मिळवलं त्यानंतर आरसीबीनं दिलेलं लक्ष 19 ओव्हरमध्ये पूर्ण करत राजस्थाननं अंतिम फेरीत धडक दिली. आरसीबीसाठी यंदाचं आयपीएल संमिश्र ठरलं. आरसीबीनं पहिल्या 8 सामन्यामध्ये केवळ 1 विजय मिळवला होता. त्यानंतर पुढच्या सहा सामन्यांमध्ये सलग विजय मिळवत त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. आरसीबीनं प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर एलिमिनेटरच्या मॅचमध्ये तरी त्यांचा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glane Maxwell) चांगली कामगिरी करेल अशी आशा होती. मात्र, ग्लेन मॅक्सवेल राजस्थान रॉयल्स विरुद्ध देखील चांगली कामगिरी करु शकला नाही. ग्लेन मॅक्सवेल शुन्यावर बाद झाला. 


ग्लेन मॅक्सवेल आर. अश्विनच्या जाळ्यात अडकला


ग्लेन मॅक्सवेलनं यापूर्वीच्या आयपीएलच्या हंगामामध्ये बंगळुरुसाठी चांगली कामगिरी केली होती. मात्र, यंदाचं आयपीएल त्याच्यासाठी निराशाजनक ठरलं आहे. राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये ग्लेन मॅक्सवेलला आर. अश्विननं बाद केलं. आर. अश्विनच्या बॉलिंगवर मॅक्सवेल ध्रुव जुरेलकडे कॅच देऊन बाद झाला.  ग्लेन मॅक्सवेलनं 2024 च्या आयपीएलमध्ये केवळ 52 धावा केल्या. 


ग्लेन मॅक्सवेलच्या आयपीएलमधील कामगिरीवर टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण संतापला आहे. मॅक्सवेल शुन्यावर बाद झाल्यानंतर इरफान पठाणनं ट्वीट करुन आपला संताप व्यक्त केला आहे. 'मॅक्सवेल काय करतोय' असं ट्विट इरफान पठाण यानं केलं. 






इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन यानं देखील कॉमेंटरी सुरु असताना मॅक्सवेलच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आजच्या मोठ्या मॅचमध्ये तुमच्यासारख्या मोठ्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करणं आवश्यक असतं. तुम्ही स्वत:ला संधी देण्याची गरज आहे. ग्लेन मॅक्सवेलकडून ते होत नसल्याचं पीटरसन म्हणाला. 




ग्लेन मॅक्सवेलनं शुन्यावर बाद होत एका नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएलमध्ये 18 वेळा शुन्यावर बाद होण्याचा विक्रम दिनेश कार्तिकच्या नावावर होता. मात्र, राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये शुन्यावर बाद मॅक्सवेलनं देखील त्याची बरोबरी केली आहे. मॅक्सवेलनंतर या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्मा 17 वेळा शुन्यावर बाद झाला आहे.  पियुष चावला, मनदीप सिंग आणि सुनील नरेनं हे देखील 15 वेळा शुन्यावर बाद झाले आहेत. 


संबंधित बातम्या :


Virat Kohli : आरसीबीचा विजयरथ राजस्थाननं रोखला, विराट कोहली निराश, पराभवानंतर काय केलं? पाहा व्हिडीओ


राजस्थानचा 4 विकेटने रॉयल विजय, आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान संपलं, चेन्नईमध्ये SRH vs RR चा सामना