RR vs RCB : आरसीबीच्या गोलंदाजीपुढे राजस्थानच्या फलंदाजांनी हराकिरी केली. राजस्थानचा डाव अवघ्या 59 धावांत संपुष्टात आला. हेटमायरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने झुंज दिली नाही. 172 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 10.3 षटकात 59 धावांत संपुष्टात आला.  वेन पार्नेल याने तीन विकेट घेतल्या.. आरसीबीने एकतर्फी विजय मिळवत प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय. करो या मरो च्या लढतीत आरसीबीने ११२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.


१७२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. पावरप्लेमध्ये राजस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता. राजस्थानला ११ षटकेही फलंदाजी करता आली नाहीत. मोक्याच्या सामन्यात राजस्थानने हराकिरी केली. या दारुण पराभवामुळे राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान खडतर झालेय... प्लेऑफमध्ये पोहचण्याचे चान्स फक्त सहा टक्के राहिलेत. 


आरसीबीच्या गोलंदाजीपुढे राजस्थानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. राजस्थानच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. राजस्थानकडून शिमरोन हेटमायर याने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. या खेळीत त्यान चार षटकार आणि एक चकर लगावला. त्याशिवाय जो रुट याने दहा धावांची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता राजस्थानच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. यशस्वी जयस्वाल आणि जो रुट या सलामी फलंदाजाला खातेही उघडता आले नाही. कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल प्रत्येकी चार धावा काढून तंबूत परतले. तर ध्रुव जुरेल एक धाव काढून बाद झाला. तर अश्विन याला खातेही उघडता आले नाही. 


आरसीबीकडून वेन पार्नेल याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. वेन पार्नेल याने तीन षटकात फक्त दहा धावा खर्च केल्या. त्याशइवाय कर्ण शर्मा आणि मिचेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. ब्रेसवेल याने तीन षटकत १६ धावा दिल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. सिराज याने दोन षटकात दहा धावा खर्च केल्या. मॅक्सवेल याने एका षटकात फक्त तीन धावा दिल्या.


आरसीबीचे १७१ धावांपर्यंत मजल


नाणेफेक जिंकून आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघात तीन फिरकी गोलंदाज होते.. राजस्थानच्या गोलंदाजीपुढे आरसीबीच्या फलंदाजांनी संथ सुरुवात केली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी संयमी फलंदाजी केली. सात षटकात दोघांनी ५० धावांची सलामी दिली. केएम आसिफ याने विराट कोहलीला बाद करत आरसीबीला पहिला धक्का दिला. विराट कोहलीने १९ चेंडूत १८ धावांची खेळी केली. यामध्ये विराटने एक चौकार लगावला. विराट कोहली बाद झाल्यानंतर फाफ डु प्लेसिसने मॅक्सवेलच्या साथीने डाव आरसीबीचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी ६९ धावांची भागिदारी केली. 


फाफ डु प्लेसिस याने संयमी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. फाफ डु प्लेसिस याने ४४ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. या खेळीत फाफने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. कर्णधार फाफ बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव ढेपाळला. ११९ धावांवर दुसरी विकेटपडल्यानंतर लागोपाठ तीन विकेट पडल्या. आरसीबीच्या फलंदाजांनी ठरावीक अंतराने विकेट फेकली. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला मॅक्सवेलने धावांचा पाऊस पाडला. मॅक्सवेलने ३३ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. या खेळीत मॅक्सवेलने तीन षटकार आणि पाच चौकार लगावले. 


फाफ आणि मॅक्सवेलचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली १८, महिपाल लोमरोर एक, दिनेश कार्तिक याला खातेही उघडता आले नाही. अनुभवी दिनेश कार्तिक पुन्हा एकदा फ्लॉप ठरला.  कार्तिकला शून्यावर झम्पाने तंबूत पाठवले. अखेरीस अनुज रावत याने वादळी फलंदाजी करत आरसीबीचा डाव १७१ धावांपर्यंत पोहचवला. मायकल ब्रेसवेल ९ धावांवर नाबाद राहिला. तर अनुज रावतयाने ११ चेंडूत नाबाद २९ धावांची खेळी केली. या खेळीत रावतने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. 


राजस्तानकडून सर्वाच गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. केएम आसिफ आणि एडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर संदीप शर्मा याने एक विकेट घेतल्या. यजवेंद्र चहल, आर अश्विन यांना विकेट मिळाली नाही.