IPL Mega Auction 2025 Anshul Kamboj CSK : जेव्हा जेव्हा आयपीएल लिलाव होतो तेव्हा काही नवे रेकॉर्ड बनतात आणि मोडले जातात. गेल्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर 24 कोटींहून अधिकची विक्रमी बोली लावली गेली आणि तो लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, पण यावेळी तो मागे राहिला. ऋषभ पंत 27 कोटी रुपयांसह सर्वात महागडा खेळाडू ठरला. फलंदाजांसोबतच फ्रँचायझीने गोलंदाजांवरही भरपूर पैसा खर्च करून त्यांना श्रीमंत केले.






दरम्यान, रणजी ट्रॉफीच्या एका डावात 10 बळी घेणाऱ्या वेगवान गोलंदाजासाठी अलीकडेच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात चांगलीच लढत रंगली होती. अंशुल कंबोजची मुळ किंमत 30 लाख रुपये होती.


अंशुल कंबोजचा गेल्या हंगामात मुंबई इंडियन्स संघात समावेश करण्यात आला होता. त्याने काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. पण मुंबई इंडियन्सने त्याला कायम ठेवले असते, अशी चांगली कामगिरी नव्हती. मात्र, मुंबई इंडियन्सच्या 2025 च्या प्लॅनमध्ये अंशुल कंबोजचा नक्कीच समावेश करण्यात आला होता. याच कारणामुळे मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी बराच काळ बोली लावली. चेन्नई सुपर किंग्ज देखील अंशुल कंबोजला करारबद्ध करण्यात व्यस्त होती. दोघांमधील बोलीची शर्यत 3.40 कोटी रुपयांवर संपली.


23 वर्षीय अंशुल कंबोज देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळतो. त्याने 19 प्रथम श्रेणी सामने आणि 15 लिस्ट ए सामने खेळले आहेत. अंशुलने या महिन्यात केरळविरुद्धच्या रणजी सामन्यात एका डावात 10 बळी घेतले होते. अंशुल कंबोजने गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून 3 सामने खेळले.






आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंनी वर्चस्व गाजवले, तर दुसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाजांनी बाजी मारली. भुवनेश्वर कुमारसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोमवारी 10.75 कोटी रुपयांची बोली लावली. दुसऱ्या दिवशीची ही सर्वात मोठी बोली ठरली. दीपक चहरला मुंबई इंडियन्सने 9.25 कोटी रुपयांना विकत घेतले. मुकेश कुमार आणि आकाश दीप यांनाही प्रत्येकी 8 कोटी रुपयांची बोली लागली.