IPL Media Rights: जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL). भारतात कोट्यवधी चाहते असणाऱ्या आयपीएलचे सामने देशाबाहेर परदेशातही पाहिले जातात. त्यामुळे परदेशात क्रिकेट सामने प्रक्षेपित करण्यासाठीचे हक्क कोणत्या कंपनीला मिळणार यासाठीही देखील लिलाव पार पडला. आयपीएलच्या मीडिया राईट्ससाठी पार पडलेल्या लिलावातील पॅकेज डीमध्ये परदेशात आयपीएल सामन्यांचे प्रसारण करण्यासाठीचे राईट्स होते. हे राईट्स वायकॉम 18 आणि टाईम्स इंटरनेट यांनी मिळून भागिदारीत विकत घेतले आहेत. तब्बल 1 हजार 324 कोटींना या पॅकेजची विक्री झाली आहे.


हे पॅकेज वायकॉम 18 आणि टाईम्सने विकत घेतल्याने काही देशांमध्ये प्रक्षेपण हे वायकॉम 18 च्या मदतीने तर काही देशांत टाईम्स इंटरनेटच्या मदतीने होईल. यावेळी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, युनायटेड किंग्डम याठिकाणचे मीडिया राईट्स वायकॉम 18 ला मिळाले आहेत. तर मीडल इस्ट आणि नॉर्थ आफ्रिकेतील देश ज्यामध्ये ईराण, इराक, ओमान, कुवेत, इजिप्त, सिरीया अशा विविध देशांचा समावेश होतो, त्यासह युनायटेड स्टेट्समधील प्रक्षेपणाचे हक्क टाईम्स इंटरनेटला मिळाले आहेत.


  


भारतातील हक्क कोणाला?


आयपीएलच्या पुढील पाच हंगामासाठी म्हणजेच 2023 ते 2027 या कालावधीत आयपीएल प्रसारण हक्कांसाठीची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. भारतीय उपखंडासाठी टिव्ही आणि डिजिटल हक्क, तसंच प्लेऑफच्या निवडक सामन्यांसाठीचे हक्क आणि परदेशात आयपीएल सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क अशा एकूण चार पॅकेज्सची विक्री यावेळी झाली. हा संपूर्ण व्यवहार 48 हजार 390 कोटींमध्ये झाला आहे. यावेळी टीव्हीसाठीचे हक्क डिजनी स्टारने आपल्याकडे कायम ठेवले यासाठी त्यांनी 23 हजार 575 कोटी रुपये मोजले. तर डिजीटल प्लॅटफॉर्मसाठीचे हक्क 20 हजार 500 कोटींना वायकॉम 18 कंपनीला विकले गेले आहेत. आयपीएलच्या 410 सामन्यांसाठी या हक्कांची विक्री झाल्याने एका सामन्यातून जवळपास 107 कोटींची कमाई बीसीसीआय करणार आहे. यामध्ये टीव्हीच्या माध्यमातून एका सामन्यांतून जवळपास 57 कोटी तर डिजीटल प्लॅटफॉर्मवर एका सामन्यातून 50 कोटींची कमाई बीसीसीआय करेल. याशिवाय पॅकेज सीमध्ये एका सीजनच्या 18 निवडक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असणार आहे. हे पॅकेज वायकॉम 18 ने 2 हजार 991 कोटींना विकत घेतले आहे.  


हे देखील वाचा-