IPL Media Rights 2023-27 Auction : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआय (BCCI) आयपीएलच्या पुढील पाच वर्षांसाठीचे मीडिया राइट्ससाठी आज लिलाव प्रक्रिया (IPL Media Rights 2023-27  Auction) घेणार आहे. आज अर्थात 12 जून रोजी 11 वाजण्याच्या सुमारास ही लिलाव प्रक्रिया सुरु होणार आहे. यंदा या लिलाव प्रक्रियेत बऱ्याच मोठ्या कंपन्या सामिल होणार असून यामुळे BCCI ला जवळपास 50 ते 55 हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. तर नेमका हा लिलाव कसा पार पडेल यासंबधी काही माहिती जाणून घेऊ...


कोणत्या कंपन्या लिलावात सामिल?


अॅमेझॉन कंपनीने या लिलाव प्रक्रियेतून माघार घेतल्यानंतर इतर चार बड्या कंपन्यात चुरशीची टक्कर सुरु असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये वायकॉम 18, सोनी, झी आणि स्टार हॉटस्टार या कंपन्या आहे. सध्या हे सर्व हक्क स्टार हॉटस्टार यांच्याकडे असून आपल्याकडीस हे डिजीटल राईट्स कायम ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. तर झी, वायकॉम 18, सोनी यांच्यातही याच्यासाठी चुरशीची शर्यत असेल.


कसा पार पडणार लिलाव?


यावेळी डिजीटल आणि टीव्ही राईट्स वेगवेगळ्या पॅकेजमध्ये वाटले गेले आहेत. यावेळी या वेगवेगळ्या पॅकेजसाठी हा लिलाव पार पडणार आहे. 



  • पहिलं पॅकेज भारतीय उपमहाद्वीपच्या टीव्ही राइट्ससाठी आहे. यामध्ये भारत तसंच दक्षिण आशिया देशांतील IPL सामने टीव्हीवर प्रसारण करण्याचे राइट्स यावेळी देण्यात येतील. या पॅकेजची बेस प्राइस 49 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

  • दुसऱ्या पॅकेजमध्ये भारतीय उपमहाद्वीपच्या डिजीटल राइट्सचा लिलाव होईल. यामध्ये दक्षिण आशियामध्ये IPL चं डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रसारण करण्याचे राइट्स असतील. या पॅकेजची बेस प्राइस 33 कोटी रुपये आहे.

  • तिसऱ्या पॅकेजमध्ये एका सीजनच्या 18 निवडक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असतील. यात सीजनचा पहिला सामना, वीकएंडदिवशी होणारे डबल हेडरमधील सायंकाळचे सामना, चार प्लेऑफचे सामने यासाठी बोली लावण्यात येईल. यावेळी एका सामन्यासाठीची बेस प्राइस 11 कोटी रुपये असणार आहे.

  • चौथ्या पॅकेजमध्ये भारतीय उपमहाद्वीपच्या बाहेरील टीव्ही आणि डिजीटल ब्रॉडकास्टचे राइट्स असतील. याठिकाणी एका सामन्याची बेस प्राइस 3 कोटी रुपये असणार आहे.  


यावेळी चारही पॅकेजमधील सर्व सामन्यांची बेस प्राइस पाहता 5 वर्षांसाठीची एकूण बेस प्राइस 32 हजार 890 कोटी रुपये इतकी असेल. ज्यामुळे बीसीसीआयला कमीत कमी 32 हजार कोटी तरी मिळतीलंच, पण इतक्या मोठ्या कंपन्या समोर असल्याने 5 वर्षांसाठी मीडिया राइट्स मिळवण्यासाठी 50 ते 55 हजार कोटी या कंपन्या खर्च कऱण्याची शक्यता आहे. ज्यामुळे बीसीसीआय मालामाल होऊ शकते.


याआधी किती रुपयांना विकले गेले होते मीडिया राइट्स? 


IPL मीडिया राइट्ससाठी मागील लिलाव 2017 साली पार पडला होता. त्यावेळी स्टार इंडियाने 2022 पर्यंत साठी मीडिया राइट्स 16 हजार 347.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याआधी 2008 मध्ये सोनी पिक्चर्स नेटवर्कने 8 हजार 200 कोटी रुपयांची बोली लावत 10 वर्षांसाठी मीडिया राइट्स मिळवण्यात यश मिळवलं होतं.


हे देखील वाचा-