IPL Latest Marathi News: रोमांचक झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) थरारक विजय मिळवताना गुजरात टायटन्सचे (Gujarat Titans) आव्हान 3 गड्यांनी परतावले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर गुजरातने 20 षटकांत 4 बाद 199 धावा केल्यानंतर पंजाबने 19.5 षटकांत 7 बाद 200 धावा करत दमदार विजय मिळवला. 


गुजरातविरुद्धच्या या सामन्यात पंजाबचे दोन खेळाडू चमकले ते म्हणजे शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा. शशांक सिंगने नाबाद अर्धशतक झळकावत सामन्याचे चित्र पालटत पंजाबला विजयी केले. तर आशुतोषने शेवटच्या क्षणी येऊन स्फोटक फलंदाजी करत गुजरातच्या तोंडातून विजयी घास हिसकावला.


शशांक सिंग चुकून पंजाबच्या ताफ्यात


आयपीएलच्या मिनी ऑक्शनच्या वेळी शशांक सिंगला संधी देण्यात कुठल्याही फ्रँचायजीनं पुढाकार घेतला नव्हता. पंजाब किंग्सनं शशांक सिंगला चुकून संघात घेतलं होतं. यानंतर काही काळानंतर गैरसमज दूर झाले आणि पंजाबनं शशांक सिंगला संघात घेतल्याचं जाहीर केलं. यानंतर शशांक सिंगही खूप चर्चा झाली. मात्र आज त्याच खेळाडूनं गुजरातविरुद्ध पंजाबला विजय मिळवून दिला.  


विजय मिळवून दिल्यानंतर प्रीती झिंटाने काय केलं?


पंजाबची मालकीण प्रीती झिंटा हिने सामना संपल्यानंतर शशांक सिंग आणि आशुतोष शर्मासोबत सेल्फी घेतला. तसेच दोघांचे खूप कौतुकही केले. 


 






सामन्यानंतर शशांक सिंग काय म्हणाला?


शशांक सिंगने सांगितले की, सामना संपवण्याचा सराव केल्यानंतर तो प्रत्यक्षात साकारताना खूप आनंद होत आहे. मी सहसा 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करतो. परंतु यावेळी पंजाब संघाने मला 5 व्या क्रमांकावर मैदानात उतरवले. मला यापूर्वी अनेक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. शशांक सिंगने स्पष्टपणे सांगितले की, खेळाडू तेव्हाच कामगिरी करू शकतो जेव्हा त्याच्यावर विश्वास दाखवला जातो आणि त्याला संधी दिली जाते. सनरायझर्स हैदराबादने त्याला 2022 मध्ये खेळण्यासाठी जास्त संधी दिली नव्हती.


मी नाव नाही, चेंडू पाहतो-


शशांक सिंगने राशिद खानसारख्या गोलंदाजालाही झोडपून काढले. याबाबत शशांकला विचारले असता त्याने स्पष्टपणे सांगितले की, तो गोलंदाजाचा चेंडू पाहतो, त्याचे नाव नाही. शशांक सिंगने गुजरात टायटन्सविरुद्धही तेच केले. या खेळाडूने मधल्या फळीत सिकंदर रझासह 22 चेंडूत 41 धावा जोडल्या. जितेश शर्मासोबत त्याने 19 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली आणि आशुतोष शर्मासोबत या खेळाडूने 22 चेंडूत 43 धावांची भर घातली. या भागीदारींच्या जोरावरच पंजाबला रोमहर्षक विजय मिळाला.


संबंधित बातम्या:


'...तेव्हा जिंकणं अजिबात सोपं नसतं'; शुभमन गिल थेट बोलला, पराभवाचं खापर कोणावर फोडलं?


11 चेंडूत अर्धशतक, युवराज सिंगचा 16 वर्षांचा मोडलाय विक्रम; कोण आहे आशुतोष शर्मा?