Hardik Pandya Captaincy : वानखेडेच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 206 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरदाखल मुंबई इंडियन्स फक्त 186 धावांपर्यंत मजल मारु शकला. रोहित शर्माचं शतकही मुंबईला विजय मिळवून देऊ शकलं नाही. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर एमएस धोनीनं अखेरच्या 4 चेंडूवर 20 धावा चोपल्या होत्या. तोच दोन्ही डावातील फरक दिसून आला. मुंबई इंडियन्सला सहा सामन्यात चार पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सच्या लागोपाठ पराभवाला माजी खेळाडूनं हार्दिक पांड्याचं नेतृत्व जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. 


भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठान यानं मुंबई-चेन्नई सामन्यानंतर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यामध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हार्दिक पांड्याला आपल्या गोलंदाजांवर विश्वास नसल्याचेही सांगितलं. मोहम्मद नबी आणि श्रेयस गोपाल यांनी  चार षटकं चांगली गोलंदाजी केली होती. श्रेयस गोपाल यानं पहिल्याच षटकात महत्वाची विकेटही घेतली होती. तरीही हार्दिक पांड्यानं गोपाल याला पुन्हा गोलंदाजी दिलीच नाही. इतकेच नाही, तर 20 वं षटक टाकण्यासाठी आकाश मधवाल हा स्पेशालिस्ट गोलंदाज होता, तरीही हार्दिक पांड्या स्वत: गोलंदाजीला आला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामुळेच मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागल्याची टीका इरफान पठान यानं केली. 







हार्दिक पांड्याचा फ्लॉप शो - 


हार्दिक पांड्या नेतृत्वात सपशेल अपयशी ठरलाच, त्याशिवाय त्याला गोलंदाजी आणि फलंदाजीतही योगदान देता आलं नाही. हार्दिक पांड्या पहिल्या सामन्यापासून फ्लॉप राहिला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर तर माजी खेळाडूंनी सवाल उपस्थित केलेच आहेत. त्याशिवाय आता त्याच्या वैयक्तिक कामगिरीवरही प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. सहा सामन्यात हार्दिक पांड्याला फक्त 131 धावा करता आल्यात. यामध्ये 11 चौकार आणि सहा षटकारांचा समावेश आहे. हार्दिक पांड्यानं आरसीबीविरोधात तीन षटकार लगावले आहेत, म्हणजे उर्वरित पाच सामन्यात त्याला फक्त तीन षटकार ठोकता आलेत. गोलंदाजीतही हार्दिक पांड्या फ्लॉप ठरलाय. त्यानं 12 च्या इकॉनमीनं धावा चोपल्या आहेत. हार्दिक पांड्यानं सहा सामन्यात 11 षटकं गोलंदाजी केली, त्यामध्ये 132 धावा खर्च केल्या आहेत. त्याला फक्त तीन विकेट घेता आल्यात.