IPL DC vs LSG Vipraj Nigam: आयपीएल 2025 च्या हंगामातील (IPL 2025) चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायट्स (Delhi Capitals vs Lucknow Super Giants) यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात दिल्लीने लखनौचा एक विकेट्सने पराभव केला. दिल्ली आणि लखनौचा हा सामना शेवटच्या षटकांपर्यंत गेला. एकावेळी लखनौ सामना सहज जिंकेल असे वाटत असताना दिल्लीकडून आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma) आणि 20 वर्षीय विप्राज निगम (Vipraj Nigam) याने दमदार खेळी केली. विप्राज निगमने लखनौविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले.
विप्राज निगमने 15 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 39 धावांची आक्रमक खेळी केली. विप्राजच्या या खेळीचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. लखनौविरुद्ध विप्राजने 8 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन दिल्लीसाठी महत्वाची खेळी केली. विप्राज हा देशांतर्गत क्रिकेटमधील एक प्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू आहे. उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करताना, त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विप्राजने 8 विकेट्स घेऊन खळबळ उडवून दिली. आयपीएलच्या मेगा लिलावात 20 वर्षीय विप्रजला 50 लाख रुपयांना दिल्ली कॅपिटन्सने खरेदी केले होते.
विप्राज निगम कोण आहे?
विप्राज निगमला दिल्ली कॅपिटल्सने 50 लाख रुपयांना खरेदी केले. विप्राज निगमचा जन्म 28 जुलै 2004 रोजी उत्तर प्रदेशात झाला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमुळे त्याला भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिली ओळख मिळाली. त्याने 2024-25 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये एकूण 8 विकेट्स घेतल्या. विप्राज निगमला फलंदाजीच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत, पण आंध्रविरुद्धच्या सामन्यात त्याने 8 चेंडूत 27 धावांची छोटीशी खेळी करून त्याच्या संघाला 157 धावांचे लक्ष्य गाठण्यास मदत केली. विप्राज हा लेग-स्पिन गोलंदाज आहे पण गरज पडल्यास तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन मोठे फटके मारू शकतो. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातही त्याने असेच काहीसे केले. आतापर्यंत विप्राजने त्याच्या 3 सामन्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 17 विकेट्स घेतल्या आहेत.
सामना कसा रंगला?
तब्बल 209 धावा उभारल्यानंतर लखनौने दिल्लीची 5 बाद 65 अशी अवस्था केली. मात्र, कर्णधार ऋषभ पंतकडून झालेल्या चुकीमुळे लखनौला एका गड्याने पराभव पत्करावा लागला. आशुतोष शर्माचे तडाखेबंद नाबाद अर्धशतक आणि विपराज निगमचा निर्णायक अष्टपैलू खेळ दिल्लीसाठी मोलाचा ठरला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर लखनौने 20 षटकांत 8 बाद 209 धावा उभारल्या. हे आव्हान दिल्लीने 19.3 षटकांतच 9 बाद 211 धावा करून पार केले.