Delhi Capitals vs Lucknow Super Giants : आयपीएल 2025 मधील आतापर्यंतच्या सर्वात रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या हंगामातील चौथ्या सामन्यात आशुतोष शर्मा एकटा भिडला आणि लखनौच्या तोंडचा घास हिरावला. जिथे लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 209 धावांचा मोठा धावसंख्या उभारला होता. तिथे फक्त 7 धावांत 3 विकेट आणि 65 धावांत 5 विकेट गमावलेल्या दिल्लीने आशुतोष शर्माच्या बळावर जोरदार पुनरागमन केले आणि शेवटच्या षटकात फक्त 1 विकेटने सामना जिंकला. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सने केलेला हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे.

आशुतोष शर्मा एकटा भिडला अन् जिंकला!

210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. जॅक फ्रेझर मॅकगर्क एक धाव काढून बाद झाला. यानंतर शार्दुल ठाकूरने अभिषेक पोरेलला आऊट केले. तो खाते उघडू शकला नाही. यानंतर एम सिद्धार्थने समीर रिझवी आऊट केले. फक्त 7 धावांत दिल्लीने 3 विकेट गमावल्या होत्या. सुरुवातीच्या षटकांत तीन विकेट गमावलेल्या दिल्ली कॅपिटल्सला चांगल्या भागीदारीची आवश्यकता होती. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत असताना, अक्षर पटेलने फाफ डू प्लेसिससोबत चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. पण दिग्वेश राठीच्या चेंडूवर कर्णधार पटेल आऊट झाला. तो 11 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. तर, डु प्लेसिसने 29 धावा केल्या.

यानंतर, ट्रिस्टन स्टब्स. विप्राज निगम आणि आशुतोष शर्मा यांनी दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. स्टब्स 22 चेंडूत 34 धावा काढून आऊट झाला तर आशुतोष 66 धावांवर नाबाद राहिला. तो शेवटपर्यंत उभा राहिला आणि सामना जिंकणाऱ्या कामगिरीने संघाचा विजय निश्चित केला. विप्राज निगमने 39, मिचेल स्टार्कने 2, कुलदीप यादवने 5 आणि मोहित शर्माने 1 धावा केल्या. लखनौकडून शार्दुल, सिद्धार्थ, दिग्वेश आणि बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

मार्श आणि पूरनने गोलंदाजांना धू धू धुतले 

याआधी, लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात चांगली झाली. एडन मार्क्रम लवकर बाद झाल्यानंतरही, मिचेल मार्श (72) आणि निकोलस पूरन (75) यांनी दिल्लीच्या गोलंदाजांना धू धू धुतले. दोघांनीही फक्त 42 चेंडूत 87 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, मार्शने 21 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि 36 चेंडूत 72 धावा करून बाद झाला. तर पूरनने 24 चेंडूत अर्धशतक ठोकले. 30 चेंडूत 75 धावा करून पूरन अखेर बाद झाला. यादरम्यान, पूरनने त्याच षटकात सलग 4 षटकार आणि 1 चौकारही मारला.

पण, कर्णधार ऋषभ पंत पूर्णपणे अपयशी ठरला आणि त्याला 6 चेंडूत खातेही उघडता आले नाही. येथे दिल्ली कॅपिटल्सने पुनरागमन केले. मिचेल स्टार्कने एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्या तर कुलदीप यादवनेही दोन विकेट्स घेतल्या. डेव्हिड मिलरने डावाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारून संघाला 209 धावांपर्यंत पोहोचवले.