IPL 2025 Mumbai Indians vs Lucknow Super Giants: आयपीएल 2025 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) खराब कामगिरी सुरूच आहे. लखनौमधील काल झालेल्या एकाना स्टेडियमवरील सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यापैकी 3 सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मुंबई इंडियन्सना शेवटच्या 2 षटकांत जिंकण्यासाठी 29 धावा करायच्या होत्या. हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा क्रीजवर उपस्थित होते. दोघांच्या नेतृत्वाखाली, 29 धावांचे हे लक्ष्य गाठणे पूर्णपणे शक्य वाटत होते. मात्र लखनौच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर मुंबईच्या फलंदाजांना अपयश आले. शेवटच्या षटकात मुंबईचा पराभव निश्चित झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा मालक आकाश अंबानी देखील संतापल्याचे दिसून आले.
हार्दिक पांड्याचा तो निर्णय अन् आकाश अंबानींची रिअॅक्शन-
शेवटच्या षटकांत मुंबईला विजयासाठी 21 धावांची गरज होती. लखनौकडून शेवटचे षटक आवेश खानने टाकले. आवेश खानच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याला षटकार टोलावला. त्यानंतर दुसर्या चेंडूवर आवेश खानने पुनरागमन केले. दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने 2 धावा केल्या. त्यामुळे आता मुंबईला विजयासाठी 4 चेंडूत 14 धावांची गरज होती. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्याला एकही धाव काढता आली नाही. पाचव्या चेंडूत हार्दिक पांड्याने 1 धाव काढली. त्यानंतर मिचेल सँटनरने शेवच्या चेंडूत एकही धाव घेता आली नाही आणि मुंबईचा 12 धावांनी पराभव झाला. दरम्यान, सोशल मीडियावर एक नेटकरी हार्दिक पांड्या संपूर्ण मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला नाचवतोय, असंही म्हटलं आहे.
सूर्यकुमार यादवने झळकावले अर्धशतक-
मुंबईची सुरुवात अडखळती झाली. नमन धीर आणि सूर्यकुमार यादव यांनी 35 चेंडूंत 69 धावांची भागीदारी केली. यानंतर सूर्यकुमारने तिलक वर्मासोबत 48 चेंडूंत 66 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने 31 चेंडूंत अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत 9 चौकार आणि एका षटकारासह 67 धावा केल्या. आवेश खानने सूर्यकुमार यादवला बाद करून ही भागीदारी मोडली. सूर्या बाद झाल्यानंतर मुंबईला तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याकडून आशा होत्या. मात्र दोघांनाही मुंबईला सामना जिंकून देता आला नाही.