IPL 2025 Mumbai Indians vs Lucknow Super Giants: आयपीएल 2025 च्या हंगामात काल (5 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायट्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) यांच्यात सामना खेळवण्यात आला. शेवटच्या षटकापर्यंत कोणता संघ विजयी होईल, हे निश्चित नव्हते. मात्र अखेर लखनौने 12 धावांनी मुंबईचा पराभव केला. मुंबईच्या या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याला जबाबदार धरण्यात येत आहे. सोशल मीडियावर हार्दिक पांड्याने घेतलेल्या निर्णयावरुन ट्रोल करण्यात येत आहे. मात्र अनेकजण मुंबई इंडियन्सच्या पराभवामागे तिलक वर्मा जबाबदार असल्याचे म्हणत आहे. 

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध तिलक वर्माने खूप हळू फलंदाजी केली. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने चांगली फलंदाजी केली पण तिलक वर्माच्या संथ खेळीमुळे मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. तिलक वर्माने 23 चेंडूत 25 धावा केल्या. त्यानंतर संघाने त्याला रिटायर्ड आउट केले. 19 व्या षटकात तिलक वर्मा रिटायर्ड आउट झाला. तिलक वर्माच्या जागी आलेल्या मिचेल सँटनरला दोन चेंडूत फक्त दोन धावा करता आल्या. तिलक वर्माच्या संथ फलंदाजीमुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

सूर्यकुमार यादवने झळकावले अर्धशतक-

मुंबईची सुरुवात अडखळती झाली. नमन धीर आणि सूर्यकुमार यादव यांनी 35 चेंडूंत 69 धावांची भागीदारी केली. यानंतर सूर्यकुमारने तिलक वर्मासोबत 48 चेंडूंत 66 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने 31 चेंडूंत अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत 9 चौकार आणि एका षटकारासह 67 धावा केल्या. आवेश खानने सूर्यकुमार यादवला बाद करून ही भागीदारी मोडली. सूर्या बाद झाल्यानंतर मुंबईला तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याकडून आशा होत्या. मात्र दोघांनाही मुंबईला सामना जिंकून देता आला नाही. 

हार्दिक पांड्या आयपीएल सामन्यात पाच विकेट घेणारा पहिला खेळाडू 

आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात यापूर्वी कधीही कर्णधाराने आयपीएल सामन्यात पाच विकेट घेतल्या नाहीत. शुक्रवारी हार्दिक पांड्याने फक्त 35 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याची ही केवळ आयपीएलमधीलच नाही तर टी-20 मधीलही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी, 2023 मध्ये, त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 16 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या होत्या. 

संबंधित बातमी:

Hardik Pandya IPL 2025 : हार्दिक पांड्याचा चमत्कार! बदलला 16 वर्षांचा इतिहास अन् असा पराक्रम करणारा बनला जगातील पहिला कर्णधार