चंदीगड : आयपीएलमध्ये (IPL 2024) आज राजस्थान रॉयल्स(Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात मॅच होणार आहे. राजस्थान रॉयल्सनं यापूर्वी झालेल्या पाच पैकी चार मॅचमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जला पाच पैकी दोन सामन्यात विजय मिळाला आहे. गुजरात विरुद्ध झालेला पराभव विसरुन संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान मैदानात उतरेल. संजू सॅमसनला फिरकीपटू युजवेंद्र चहलकडून अधिक अपेक्षा असतील. युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आयपीएलमध्ये 200 विकेटचा टप्पा पार करण्यापासून केवळ तीन पावलं दूर आहे. आजच्या मॅचमध्ये चहल पंजाबच्या तीन विकेट घेत आयपीएलमध्ये कुणालाच न जमलेला विक्रम नावावर करु शकतो. आजच्या मॅचमध्ये चहल ही कामगिरी करु शकतो का हे पाहावं लागेल. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही दुसऱ्या बॉलरला 200 विकेटचा टप्पा गाठता आलेला नाही. 


 सध्या राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा युजवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्यानं 10 विकेट घेतलेल्या आहेत. युजवेंद्र चहलनं यंदाच्या आयपीएलमध्ये 150 मॅचमध्ये 197 विकेट घेतल्या आहेत. चहलची सरासरी 21.25 इतकी असून 7.54  इतकी इकोनॉमी आहे. युजवेंद्र चहलनं आयपीएलमध्ये  40 धावांवर  5 विकेट ही सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. 


युजवेंद्र चहलनं 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदारप्ण केलं होतं. चहलच्या नावावर आयपीएलमध्ये 197 विकेट आहेत. दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो आहे. ब्राव्होनं  161 मॅचमध्ये 183 विकेट घेतलेल्या आहेत.  ब्राव्होनं आयपीएलमधून निवृत्ती घेतेली आहे. 
 
मुंबई इंडियन्सचा बॉलर पियूष चावला या मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. पियूष चावलानं  185 मॅचमध्ये 181 विकेट घेतल्या आहेत. तर अमित मिश्रा आणि भुवनेश्वर कुमार संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत. दोघांनी 173 विकेट घेतलेल्या आहेत. रविचंद्रन अश्विननं  172, लासिथ मलिंगा 170 , सुनील नरेन 167 , रवींद्र जडेजानं 156 विकेट घेतल्या आहेत. यानंतर जसप्रीत बुमराह आणि हरभजन सिंह यांचा क्रमांक लागतो. 


युजवेंद्र चहलसाठी यंदाचं आयपीएल चांगलं ठरलं आहे. सुरुवातीच्या पाच मॅचमध्ये चहलनं 10 विकेट घेतल्या आहेत. पंजाब किंग्ज विरुद्ध चहलनं तीन विकेट घेतल्यास तो 200 विकेटचा टप्पा पार करेल. त्याशिवाय एक विकेट घेतली तरी तो पर्पल कॅपचा मानकरी ठरेल. बुमराह आणि चहलच्या नावावर 10 विकेट आहेत. मात्र, बुमरहानं कमी धावा दिल्यानं सध्या पर्पल कॅपचा मानकरी बुमराह आहे. 


राजस्थान आज कमबॅक करणार?


राजस्थान रॉयल्सनं पहिल्या चार मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर गुजरात टायटन्स विरुद्ध अखेरच्या बॉलवर पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवातून बाहेर पडत राजस्थान कमबॅक करणार का हे पाहावं लागणार आहे. 


संबंधित बातम्या : 


 IPL 2024, MI vs CSK :ऋतुराज हार्दिक आमने सामने, मुंबई आणि चेन्नईच्या संभाव्य प्लेईंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी?


Rohit Sharma : ना दिल्ली, ना लखनौ आता चेन्नईची चर्चा, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार? नवा दावा नेमका कुणी केला?