IPL 2024 Rishabh Pant: आयपीएल 2024 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदी अशी शिक्षा ऋषभ पंतला ठोठवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध होणाऱ्या सामन्यात ऋषभ पंत खेळू शकणार नाही. (Rishabh Pant suspended for a match)
प्ले ऑफची फेरी गाठण्यासाठी सध्या अनेक संघांमध्ये चुरस रंगली आहे. प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी दिल्लीला आगामी दोन सामन्यात विजय मिळवावा लागले. मात्र याचदरम्यान ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी लादल्याने दिल्लीलाहा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीसाठी ऋषभ पंत यष्टीरक्षक आणि कर्णधारपदाची भूमिका बजावतो. याआधी दोनदा पंतवर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई झाली होती.
दिल्लीचा बंगळुरुविरुद्ध सामना- (IPL 2024 Delhi Capitals vs Royal Challengers Bengluru)
दिल्ली आणि बंगळुरु यांच्यात रविवारी सामना होणार आहे. दिल्ली सध्या 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. तर बंगळुरुचा संघ 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. दोघांसाठी हा सामना जिंकणे महत्वाचे असणार आहे. जर दिल्लीने हा सामना जिंकल्यास प्ले ऑफमध्ये आपलं स्थान निश्चित करेल आणि बंगळुरु बाहेर जाईल. मात्र ऋषभ पंतच्या गैरहजेरीत दिल्ली कोणत्या रणनिती घेऊन मैदानात उतरेल, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
काय आहे नेमका नियम?
स्लो ओव्हर रेटच्या नियमांनुसार, एकाच हंगामात दुसऱ्यांदा ही चूक झाल्यास कर्णधाराला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात येतो. संघातील इतर खेळाडूंनाही 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात येतो. तिसऱ्यांदा ही चूक केल्यावर कर्णधारावर 30 लाख रुपयांसह एका सामन्याची बंदी घालण्यात येईल. यासोबतच संघातील उर्वरित खेळाडूंकडून प्रत्येकी 12 लाख रुपये किंवा 50 टक्के दंड आकारण्यात येतो.