अहमदाबाद: आयपीएलमध्ये काल गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात मॅच पार पडली. या मॅचमध्ये गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जला  35 धावांनी पराभूत केलं. शुभमन गिलच्या (Shubhman Gill) नेतृत्त्वातील गुजरात टायटन्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 विकेटवर 231 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जनं 8 विकेटवर 196 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं या विजयासह प्लेऑफमधील प्रवेशाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. गुजरातकडून  शुभमन गिल आणि साई सुदर्शननं शतक झळकावलं होतं. गुजरातच्या विजयात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलवर बीसीसीआयनं मोठी कारवाई केली आहे. 


बीसीसीआयनं शुभमन गिलला लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये स्लो ओव्हर रेट प्रकरणी शुभमन गिलवर 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, दुसरीकडे गुजरातच्या इतर खेळाडूंना  मॅच फीच्या 25 टक्के रक्कम किंवा 6 लाख रुपये असा दंड ठोठावण्यात आला आहे. 


शुभमन गिलवर न केलेल्या चुकीसाठी दंड?


बीसीसीआयनं शुभमन गिल आणि गुजरात टायटन्सच्या खेळाडूंवर स्लो ओव्हर रेट प्रकरणी दोषी धरत कारवाई केली आहे. शुभमन गिलवर अशा प्रकारची कारवाई या पूर्वी देखील करण्यात आली होती. पहिल्या वेळी शुभमन गिलवर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. शुभमन गिलवर बीसीसीआयनं 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. मात्र, चेन्नईची फलंदाजी सुरु असताना शुभमन गिल डग आऊटमध्ये होता. गुजरातचं नेतृत्त्व त्यावेळी राहुल तेवतिया करत होता. त्यामुळं काही नेटकऱ्यांनी शुभमन गिलवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. 




गुजरातची प्लेऑफची आशा कायम


चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केल्यानं गुजरात टायटन्सच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. गुजरात टायटन्सनं 12 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवल्यानं त्यांचे 10 गुण झाले आहेत. चेन्नई विरुद्धच्या मॅचपूर्वी दहाव्या स्थानावर असणारी गुजरातची टीम विजयानंतर आठव्या स्थानावर पोहोचली आहे. 


गुजरात टायटन्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 3 विकेटवर 231 धावा केल्या होत्या. शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोन्ही सलामीवीरांनी शतकं झळकावली होती. शुभमन गिलनं 55 बॉलमध्ये 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 104 धावा केल्या. तर, साई सुदर्शननं 51 बॉलमध्ये 5 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीनं 103 धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागिदारी केली. 


चेन्नई सुपर किंग्जला या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता आला नाही. चेन्नईची टीम 20 ओव्हरमध्ये 8 विकेटवर 196 धावा करु शकली. डॅरिल मिशेल आणि मोईन अलीनं अर्धशतकं केली मात्र ते चेन्नईला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.


संबंधित बातम्या : 


Rohit Sharma : हे तर माझं शेवटचं? रोहित शर्मा अन् अभिषेक नायरच्या व्हिडीओनं खळबळ, केकेआरकडून पोस्ट डिलीट, दावे प्रतिदावे सुरु


Rohit Sharma : ये हिरो, काय करतोय...रोहित शर्मानं घेतली तिलक वर्माची फिरकी, मुंबई इंडियन्सकडून व्हिडीओ शेअर