कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आयपीएलमधील 36 वी मॅच पार पडली. कोलकाता नाईट रायडर्सनं केवळ एका रननं विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 20 ओव्हरमध्ये 221 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आज यंदाच्या आयपीएलमधील सातवा पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीला आजच्या पराभवामध्ये एक आशेचा किरण दिसला तो म्हणजे कर्ण शर्मा (Karn Sharma) होय. कर्ण शर्मानं मिशेल स्टार्कला शेवटच्या ओव्हरमध्ये तीन षटकार ठोकत आरसीबीला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं होतं.
शेवटच्या ओव्हरचा थरार
आरसीबीला शेवच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे प्रमुख फलंदाज बाद झाले होते. कर्ण शर्मा स्ट्राइकवर होता. कर्ण शर्मानं पहिल्याच बॉलवर मिशेल स्टार्कला सिक्स मारला. यानंतर मिशेल स्टार्कनं दुसरा बॉल टॉकला. हा बॉल कर्ण शर्मानं मारायचा प्रयत्न केला मात्र बॅटला स्पर्श करुन तो विकेटकीपरकडे गेला. मात्र, तो बॉल विकेटकीपरपर्यंत कॅरी होऊ शकला नाही. थर्ड अम्पायरनं कर्ण शर्माला नॉट आऊट दिलं. यानंतर कर्ण शर्मानं पुढच्या दोन बॉलमध्ये दोन सिक्स मारले. आता विजयासाठी आरसीबीला 2 बॉलमध्ये 3 धावांची गरज होती. पुढच्या बॉलवर स्टार्कला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कर्ण शर्मानं केला मात्र स्टार्कनं चांगली फिल्डींग करत कॅच घेतला आणि कर्ण शर्मा बाद झाला. कर्ण शर्मानं 7 बॉलमध्ये 20 धावा करुन आरसीबीला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. अखेरच्या बॉलवर आरसीबीला केवळ एक रन करता आली आणि केकेआरनं मॅच एका रननं जिंकली.
दिनेश कार्तिकनं कर्ण शर्माला संधीच दिली नाही
आरसीबीचा प्रमुख फलंदाज दिनेश कार्तिकनं 19 व्या ओव्हरमध्ये संधी असून देखील कर्ण शर्माला स्ट्राईक दिली नाही. दिनेश कार्तिकनं 19 व्या ओव्हरमध्ये एक सिक्स आणि एका फोरसह 10 धावा काढल्या. दिनेश कार्तिक 19 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बाद झाला.
मिशेल स्टार्कनं खोऱ्यानं धावा दिल्या
आयपीएलमधील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेल्या मिशेल स्टार्कनं खोऱ्यानं धावा दिल्या आहेत. मिशेल स्टार्क कोलकाता नाईट रायडर्सनं ज्या अपेक्षेनं संघात घेतलं त्या अपेक्षा पूर्ण करु शकलेला नाही. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 53 दिल्या होत्या. आरसीबीविरुद्ध त्यानं 47 धावा दिल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्यानं 2 विकेट घेत 25 धावा दिल्या. चेन्नई विरुद्ध त्यानं 29 धावा दिल्या. लखनौविरुद्ध स्टार्कनं चांगली कामगिरी केली, त्यानं 3 विकेट घेत 28 धावा दिल्या. राजस्थान रॉयल्स विरुद्ध मिशेल स्टार्क पुन्हा एकदा महागडा ठरला त्यानं 50 धावा दिल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध आज देखील मिशेल स्टार्कनं 55 धावा देत 1 विकेट घेतली.
संबंधित बातम्या :
Video : जोरात बॅट झटकली, अम्पायरवर गेला धावून, आऊट दिल्यानं विराट खवळला; मैदानातच रागराग!