IPL 2024 Prize Money Marathi News: आयपीएल 2024 च्या हंगामातील अंतिम सामना 26 मे (रविवार) रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात एमए चिदंबरम, चेन्नई येथे खेळवला जाईल. अंतिम फेरीत कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आयपीएलच्या अंतिम फेरीत विजयी होणाऱ्या संघाला ट्रॉफीसह कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. या वर्षी विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाणार, याबाबत जाणून घ्या.
आयपीएल 2024 च्या विजेत्या संघाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2024 च्या जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या म्हणजेच उपविजेता संघाला 13 कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या राहिलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला 7 कोटी आणि चौथ्या स्थानावर राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 6.5 कोटी मिळणार आहेत.
आयपीएलमधील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळालेल्या बक्षीस रकमेशिवाय इतरही अनेक पुरस्कार दिले जातात. यामध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप या पुरस्कारांचा समावेश आहे. आयपीएलच्या संपूर्ण हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप पुरस्कार दिला जातो. ऑरेंज कॅप विजेत्याला 15 लाख रुपये दिले जातील. ऑरेंज कॅप जिंकण्याच्या शर्यतीत विराट कोहली आघाडीवर आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यावेळी 15 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. हर्षल पटेल पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तसेच इमर्जिंग प्लेयरला 20 लाख रुपये दिले जाईल.
हैदराबादची फायनलमध्ये धडक-
सनरायजर्स हैदराबादने राजस्थानवर 36 धावांनी रॉयल विजय मिळवत दिमाखात फायनलमध्ये धडक मारली आहे. 26 मे 2024 रोजी चेन्नईच्या चेपॉकवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये चषकासाठी भिडत होणार आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 175 धावा केल्या होत्या. त्यानंतर राजस्थानला 139 धावांपर्यंतच रोखलं. हैदराबादच्या फिरकी गोलंदाजाच्या जाळ्यात राजस्थानचे फलंदाज अडकले. राजस्थानकडून यशस्वी जायस्वाल आणि ध्रुव जुरेल यांनी एकाकी झुंज दिली. हैदराबादकडून शाहबाद अहमद आणि अभिषेक शर्मा यांनी भेदक मारा केला.