IPL 2024 Orange Cap Latest Marathi News: राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू रियान पराग इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2024 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. काल म्हणजेच 1 एप्रिलला रियान परागने मुंबई इंडियन्सविरुद्ध 54 नाबाद धावांची स्फोटक फलंदाजी केली. यानंतर रियान परागला आयपीएलची ऑरेंज कॅप देण्यात आली. मुंबई आणि राजस्थानविरुद्धच्या सामन्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा खेळाडू विराट कोहलीकडे ऑरेंज कॅप होती. 






विराट अन् रियानच्या समान धावा-


रियान परागने 3 सामन्यात 181 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने देखील 3 सामन्यात 181 धावा केल्या आहेत. मग रियान परागला कोणत्या आकड्यांवरुन ऑरेंज कॅप दिली गेली?, असा सवाल उपस्थित केला जातोय.


स्ट्राइक रेट हेच खरे रहस्य!


धावा समान असूनही रियान परागला विराट कोहलीच्या पुढे ठेवणारी गोष्ट म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट. परागचा स्ट्राइक रेट 160.17 आहे. तर कोहलीचा स्ट्राइक रेट 141.40 आहे. म्हणजे पराग कमी चेंडूत जास्त धावा करत आहे. त्यामुळे त्याला ऑरेंज कॅप देण्यात आली. या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली आहेत. पण परागने षटकारांच्या बाबतीतही कोहलीला पराभूत केले आहे. रियान परागने आतापर्यंत 12 षटकार मारले आहेत. तर कोहलीच्या बॅटमधून फक्त 7 षटकार लागले आहेत.


रियान पराग त्याच्या या स्फोटक खेळीबद्दल काय म्हणाला?


मुंबईविरुद्धच्या खेळीनंतर रियान पराग म्हणाला, "गेल्या 3-4 वर्षात माझी आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिलेली नाही. परफॉर्मन्स नसतो, तेव्हा परत येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मी खूप सराव केला आहे. मला अशा परिस्थितीची सवय आहे. वडिलांना घरून सर्व काही पहायला आवडते. त्यांना प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायला आवडते. पण यावेळी आई स्टेडियममध्ये उपस्थित होती", असं रियान पराग म्हणाला.


राजस्थानने मारली बाजी-


राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 9 विकेट गमावून केवळ 125 धावा करता आल्या. आरआरसाठी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने 22 धावांत 3 बळी घेतले. तर लेगस्पिनर युजवेंद्र चहलने 11 धावांत 3 बळी घेतले.प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकांत 4 गडी गमावून 127 धावा केल्या. यात रियान परागच्या अर्धशतकाचाही समावेश आहे. आरआरने हा सामना सहा गडी राखून जिंकला. या विजयासह राजस्थान रॉयल्स पुन्हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.


संबंधित बातम्या:


Rohit Sharma: मैदानावर अचानक तो धावत आला, रोहित शर्मा घाबरुन दोन पावले मागे गेला; स्वत:ला सावरत हात मिळवला! Video


Rohit Sharma: चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला हूटिंग; रोहित शर्माची 5 सेकंड्सची रिॲक्शन अन् जिंकलं पुन्हा मन!