Rohit Sharma, Hardik Pandya Latest Marathi News: राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 125 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकांत 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. राजस्थान रॉयल्सने सलग तिसरा सामना जिंकला.


मुंबईने काल राजस्थानविरुद्ध यंदाच्या आयपीएलमधील पहिल्यांदाच घरच्या मैदानावर सामना खेळला. मुंबईचा पहिला सामना गुजरात आणि दुसरा सामना हैदराबादच्या मैदानावर खेळला होता. या दोन सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला रोहित शर्माच्या चाहत्यांकडून ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे मुंबईतील वानखेडे मैदानावर देखील चाहते हार्दिकला लक्ष्य करतील, हे स्पष्ट होते आणि काल असेच घडले. हार्दिक पांड्या वानखेडेनवर नाणेफेकीसाठी आला होता. नाणेफेकीवेळी चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला हूटिंग करण्यात आले. 


सामनादरम्यान देखील वानखेडेवर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी रोहित शर्माच्या घोषणांनी मैदान दणाणून सोडलं. मुंबईच्या सामन्यात रोहित शर्माच्या चाहत्यांनी वानखेडेबाहेर वातावरण निर्मिती केली होती. चाहत्यांनी मैदानात 'मुंबई का राजा रोहित शर्मा'च्या घोषणा दिल्या. सामना सुरु झाल्यापासून तो संपेपर्यंत रोहित शर्मा नावाच्या घोषणा चाहत्यांकडून दिल्या जात होत्या. यादरम्यान रोहित शर्माने क्षेत्ररक्षण करताना प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले. रोहित शर्माचा 5 सेकंड्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहितच्या या कृतीनं त्याने पुन्हा एकदा मन जिंकल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे. 






मुंबईचा सलग तिसरा पराभव-


ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहलची घातक गोलंदाजी आणि रियान परागच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर राजस्थानने 27 चेंडू शिल्लक असताना मुंबईचा 6 गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव आहे. तर राजस्थानचा हा सलग तिसरा विजय आहे. घरच्या मैदानावर प्रथम खेळल्यानंतर मुंबई इंडियन्सला केवळ 125 धावा करता आल्या. यानंतर गोलंदाजांनी यशस्वी जैस्वाल, जोश बटलर आणि संजू सॅमसन यांना स्वस्तात बाद केले, मात्र रियाग परागने 39 चेंडूत नाबाद 54 धावा करत राजस्थान संघाला विजय मिळवून दिला.


मुंबईचा संघ तळाशी - 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकही विजय नोंदवता आला नाही. तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गुणतालिकेत मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. मुंबई हा एकमेव असा संघ आहे, ज्याला अद्याप एकही विजय नोंदवता आला नाही. तर दुसरीकडे कोलकाता आणि राजस्थान संघाला अद्याप एकाही पराभवाचा सामना करावा लागला नाही.  राजस्थानचा संघ गुणातलिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.


संबंधित बातम्या:


Rohit Sharma: मैदानावर अचानक तो धावत आला, रोहित शर्मा घाबरुन दोन पावले मागे गेला; स्वत:ला सावरत हात मिळवला! Video