Rishabh Pant, Mohammed Shami IPL 2024 Medical Updates: सध्या देशात आयपीएलचे (IPL 2024) वारे वाहू लागलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच जेव्हा जेव्हा आयपीएलची चर्चा होते, तेव्हा तेव्हा ऋषभ पंतच्या कमबॅकच्या नवनव्या तारखा समोर येतात. पण आता खुद्द बीसीसीआयनं ऋषभ पंतच्या कमबॅकसाठी (Rishabh Pant Comeback) ग्रीन सिग्नल दिला आहे. ऋषभ पंत आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं बीसीसीयानं स्पष्ट केलं आहे. मात्र, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा दोघेही आयपीएल खेळण्यासाठी फिट नसल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ऋषभ पंत, मोहम्मद शामी आणि प्रसिद्ध कृष्णा या टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंच्या आयपीएल खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त केलं जात होतं. अशातच आता खुद्द बीसीसीआयनं तिघांच्या फिटनेसबाबात रिपोर्ट जाहीर केला आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या मेडिकल अपडेटमध्ये ऋषभ पंत आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं सांगितलं आहे. तर मोहम्मद शामी आणि प्रसिद्ध कृष्णा आयपीएल 2024 मध्ये खेळू शकणार नाहीत, असं स्पष्ट केलं आहे.
दिल्ली कॅपिटल्ससाठी शुभसंकेत!
30 डिसेंबर 2022 रोजी उत्तराखंडच्या रुडकीजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर ऋषभ पंत टीम इंडिया आणि क्रिकेटपासून दूर होता. सुमारे 14 महिन्यांच्या रिहॅब आणि रिकव्हरी प्रोसेसनंतर, ऋषभ पंतला आता आयपीएल 2024 मध्ये विकेटकिपर बॅट्समन म्हणून तंदुरुस्त घोषित करण्यात आलं आहे. एकूणच, बीसीसीआयनं जारी केलेल्या मेडिकल अपडेटमधून ही घोषणा करण्यात आली आहे. एकंदरीत आगामी आयपीएल सीझनला सुरुवात होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे.
मोहम्मद शामी आयपीएलमधून बाहेर
बीसीसीआयनं मोहम्मद शामीचं मेडिकल अपडेट देखील जारी केलं आहे. मोहम्मद शामीला त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे 26 फेब्रुवारी 2024 रोजी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे, शामीही आयपीएल 2024 मधून बाहेर आहे.