Suryakumar Yadav, IPL 2024 : टी20 मधील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आयपीएलमध्ये अद्याप एकही सामना खेळला नाही. मुंबई इंडियन्सला (mumbai indians) सुरुवातीच्या सामन्यात सूर्यकुमार यादव याची कमी जाणवली. सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीमुळे पहिल्या दोन्ही सामन्यात मुंबईचा दारुण पराभव झाला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सचा आज यंदाच्या हंगामातील तिसरा सामना राजस्थान रॉयल्सविरोधात (mi VS rr) घरच्या मैदानावर होणार आहे. आयपीएल सुरु झाल्यापासून सूर्यकुमार यादव मुंबईच्या ताफ्यात कधी परतणार? याचीच चर्चा सुरु आहे. सूर्यकुमार यादव गेल्या काही दिवसांपासून एनसीएमध्ये फिटनेसवर काम करतोय. सूर्या मुंबईच्या ताफ्यात कधी दाखल होणार? याबाबतची माहिती स्टार फिरकी गोलंदाज पियूष चावला यानं दिली आहे.
सूर्यकुमारच्या मैदानात कधी उतरणार ?
वानखेडेच्या मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये लढत होणार आहे. आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळण्याची शक्यता नाही. सामन्याआधी पियूष चावलाने सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबाबत माहिती दिली. पियूष चावला म्हणाला की, "सूर्यकुमार यादव याच्या फिटनेसबाबत एनसीएमधून कोणताही माहित मिळालेली नाही. सूर्यकुमार यादव बंगळुरुमध्ये एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत आहे. त्याच्याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. खेळाडूपेक्षा प्रशिक्षकाला याबाबत जास्त माहिती असेल. "
घरच्या मैदानावर मुंबईचा पहिलाच सामना -
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच घरच्या मैदानावर खेळणार आहे. राजस्थान आणि मुंबई यांच्यातील सामना वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी होणार आहे. मुंबईला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे ते गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबई आज विजयाचं खाते उघडण्यासाठी मैदानात उतरले. आजच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाल्यास टीका आणि अडचणीचा सामना करावा लागेल.
डिसेंबर 2023 पासून सूर्या क्रिकेटपासून दूर -
आयपीएल 2023 मध्ये सूर्यकुमार यादव यानं झंझावती फलंदाजी केली होती. सूर्यानं 16 व्या हंगामात 600 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला होता. विश्वचषकानंतर सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यानंतर सूर्यकुमार यादव याला दुखापत झाली होती, तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूरच आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव आयपीएलचे सुरुवातीचे सामने मुकण्याची शक्यता आहे. एनसीएकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याला आयपीएलमध्ये खेळता येणार आहे. आगामी विश्वचषक पाहता बीसीसीआय कोणताही धोका पत्करणार नाही. सूर्यकुमार यादवने मुंबईसाठी 85 सामन्यात 2641 धावा केल्या आहेत.
विश्वचषकासाठी सूर्याची फिटनेस महत्वाची -
आयपीएल 2024 नंतर भारतीय संघ टी 20 विश्वचषकासाठी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये जाणार आहे. विश्वचषकामध्ये सूर्यकुमार यादवची उपस्थिती टीम इंडियासाठी महत्वाची आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव याच्याबाबत बीसीसीआय कोणताही धोका पत्कारणार नाही. 100 टक्के तंदुरुस्त झाल्यानंतर सूर्यकुमार यादव याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाणार आहे.