मुंबई : आयपीएलचं 17 वं (IPL 2024) पर्व सुरु झालं असून आतापर्यंत झालेल्या दोन  मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला.  मुंबईचं नेतृत्त्वं यंदा रोहित शर्मा (Rohit Sharma) ऐवजी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) करत आहे. मुंबई इंडियन्सचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर झालेल्या दोन मॅचेसमध्ये हार्दिक पांड्याला मॅच पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांकडून आणि सोशल मीडिया यूजर्सकडून ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. हार्दिक पांड्याच्या पत्नीवर देखील काही जणांनी टीका केली होती. या सर्व गोष्टीनंतर अनेकांनी हार्दिकची पाठराखण केली आहे. मुंबईचे बॅटिंग कोच किरोन पोलार्ड यांनी हार्दिकच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं.आता अभिनेता सोनू सूद देखील हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे  


सोनू सूद काय म्हणाला?


हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ सोनू सूदनं एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यानं आपण आपल्या खेळाडूंचा सन्मान केला पाहिजे असं म्हटलं आहे.  खेळाडूंमुळं आपली, आपल्या देशाची मान उंचावते. आपण त्यांना एका दिवशी प्रोत्साहन देतो,  दुसऱ्या दिवशी आपण त्यांचा  तिरस्कार करतो. हे त्यांचं नसून आपलं अपयश आहे, असं सोनू सूद म्हणाला. 


सोनू सूदनं पुढं म्हटल की, मी क्रिकेटवर प्रेम करतो. जो देशासाठी क्रिकेट खेळतो त्या प्रत्येकावर प्रेम करतो मग कोणत्याही फ्रंचायजीसाठी तो खेळत असतो. संबंधित खेळाडू कॅप्टन असो किंवा संघातील 15 वा खेळाडू असो, असं सोनू सूदनं म्हटलं.  ते आपले हिरो आहेत, असंही सोनू सूद म्हणाला. 






मुंबई कमबॅक करणार?


हार्दिक पांड्यानं गुजरातचं नेतृत्त्व सोडून मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व स्वीकारलं होतं. रोहित शर्माच्या जागी टीम मॅनेजमेंटनं हार्दिकला नेतृत्त्वाची जबाबदारी दिली होती, यामुळं मुंबईचे चाहते हार्दिकवर नाराज होते. मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत आयपीएलमध्ये दोन मॅच खेळल्या आहेत.
 
मुंबईला गुजरातच्या संघाविरुद्ध खेळताना 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर, सनरायजर्स हैदराबाद 31 धावांनी पराभव झाल्यानंतर हार्दिक पांड्यावर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. मुंबई इंडियन्स येत्या सोमवारी राजस्थान रॉयल्स आमने सामने येणार आहेत. दोन मॅचमधील पराभवानंतर मुंबई  होम ग्राऊंडवर विजय मिळवत स्पर्धेत कमबॅक करणार का हे पाहावं लागणार आहे. मुंबईला आयपीएलमध्ये कमबॅकरण्यासाठी फलंदाजीसह सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईच्या टीमला सूर गवसणार का हे 1 एप्रिलच्या मॅचमध्ये दिसून येईल.


संबंधित बातम्या :  


IPL 2024 : आरसीबीच्या बॉलिंगला चोपणाऱ्या सुनील नरेनला काही कळलंच नाही, मयंक डागरचा बॉल थेट स्टम्पवर आदळला, पाहा व्हिडीओ


IPL 2024 : आरसीबीच्या स्वप्नांवर पाणी फेरणाऱ्या व्यंकटेश अय्यरचा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात लांब सिक्स,बॉल थेट स्टेडियम बाहेर