Lok Sabha Elections IPL 2024 : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. आयपीएल 2024 च्या हंगामाबाबत बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी आयपीएल स्पर्धा नियोजित वेळापेक्षा लवकर अथवा भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका हे आहे. त्यामुळेच बीसीसीआय याबाबत विचार करत आहे. बीसीसीआय अथवा आयपीएलकडून याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


'आज तक' न्यूज वेबसाइटने दिलेल्या बातमीनुसार बीसीसीआय आयपीएल 2024 स्पर्धा लवकर आयोजित करु शकते. त्यासाठी विंडोची शोधमोहिम सुरु झाली आहे. प्रत्येक संघाचं आंतरराष्ट्रीय वेळापत्रक तपासले जात आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलच्या आयोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आधी किंवा विदेशात स्पर्धा घेण्याबाबत बीसीसीआय विचाराधीन आहे. आयपीएल 2024 चा अंतिम सामना मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतो. पण सध्या संपूर्ण लक्ष 2023 च्या विश्वचषकावर आहे. त्यानंतरच कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जाईल.






आयपीएलचा आगामी हंगाम लवकर पार पाडण्याबरोबरच विदेशातही त्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. मात्र, भारतालाच प्राधान्य दिले जाईल. याआधीही विदेशात आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे दक्षिण आफ्रिकेला आयपीएलचे यजमानपद देण्यात आले. त्याशिवाय 2014 मधील काही सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले होते तर काही सामने भारतात झाले होते. आयपीएल 2014 चा अंतिम सामना बंगळुरू येथे खेळला गेला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. कोलकाताने अंतिम सामना तीन विकेट्सने जिंकला होता.






भारतात होणाऱ्या लोकसभा 2024 च्या निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याआधी आचारसंहिता आणि तयारी या सर्व बाबी असणार आहेत. याच कालावधीमध्ये भारतामध्ये आयपीएल स्पर्धा होत असते. त्यामुळे यंदाही आयपीएल स्पर्धा भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जून महिन्यात टी 20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलबाबात काय निर्णय घेणार? हा येणारा काळात समजणार आहे.