कोलकाता : आयपीएलमध्ये 28 वी मॅच लखनौ सुपर जाएंटस आणि कोलकाता सुपर जाएंटस यांच्यात झाली. या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं मोठा विजय मिळवला. लखनौ सुपर जाएंटसनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 161 धावा केल्या होत्या. लखनौनं दिलेलं आव्हान पार करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरलेल्या कोलकातानं 8 विकेटनं विजय मिळवला आहे. कोलकाताच्या विजयात फिलीप सॉल्ट आणि श्रेयस अय्यरनं केलेल्या भागिदारीची भूमिका महत्त्वाची ठरली. लखनौला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का बसला आहे. मात्र, निळ्या जर्सीत मैदानावर उतरणारी लखनौ सुपर जाएंटसची टीम मरुन अँड ग्रीन रंगाच्या जर्सीत खेळताना पाहायला मिळाली.
लखनौ सुपर जाएंटसची टीम आज ग्रीन अँड मरुन रंगाच्या जर्सीत पाहायला मिळाली. लखनौनं अचानक जर्सीचा रंग का बदलला असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. खरंतर लखनौ सुपर जाएंटसनं आयपीएलमध्ये पहिल्यांदा 2022 पदार्पण केलं होतं. लखनौची टीम त्यावेळी अॅक्वा रंगाच्या जर्सीमध्ये दिसली होती. त्यानंतर म्हणजेच 2023 च्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंटस निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये दिसून आली होती. मात्र एका मॅचमध्ये लखनौची टीम मरुन अँड ग्रीन रंगाच्या जर्सीत मॅच खेळताना दिसून आली होती. गेल्यावेळी जे घडलं होतं तसंच यावेळी देखील घडलं आहे. केकेआर विरुद्धच्या मॅचमध्ये लखनौची टीम ग्रीन अँड मरुन जर्सीत दिसून आली.
लखनौच्या टीमनं जर्सी का बदलली?
लखनौ सुपर जाएंटसच्या टीमची मालकी आरपीएसजी ग्रुपकडे आहे. या ग्रुपकडे मोहन बागान एथलेटिक क्लबची देखील मालकी आहे. 2023 मध्ये याच्या नावात बदल करुन मोहन बागान सुपर जाएंटस असं करण्यात आलं आहे. आरपीएसजी ग्रुपची रायजिंग पुणे सुपरजाएंटस ही टीम आयपीएल खेळलेली होती. पुण्याच्या टीमचा आयपीएलच्या दोन स्पर्धांमध्ये सहभाग होता. मोहन बागानला सपोर्ट करण्यासाठी लखनौ सुपर जाएंटस ग्रीन अँड मरुन रंगाची जर्सी घालतात.
1889 मध्ये स्थापन झालेला मोहन बागान भारतातील सर्वात जुना फुटबॉल क्लब आहे. हा क्लब कोलकातामध्ये क्रिकेटला पाठिंबा देतो, मात्र याची मालकी आरपीएसजी ग्रुपकडे आहे. त्यामुळं लखनौ सुपर जाएंटसला देखील समर्थन मिळवण्यासाठी जर्सीचा रंग बदलण्यात आला होता.
दरम्यान, आज झालेल्या पराभवानंतर लखनौ सुपर जाएंटसची गुणतालिकेत घसरण झालेली आहे. सहापैकी तीन मॅचमध्ये पराभव आणि तीन मॅचमध्ये विजय यासह 6 गुणांच्या जोरावर लखनौ आता गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2024 : जीव ओवाळून टाकेन, रोहित शर्मासाठी जीवाची बाजी लावेन : प्रीती झिंटा