KL Rahul LSG IPL 2024 : केएल राहुल आणि लखनौचे मालक संजीव गोयंका यांच्यामध्ये सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. आठ मार्च रोजी हैदराबाद येथे झालेल्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सचा लाजिरवाणा पराभव झाला होता. सनरायझर्स हैदराबादनं लखनौचा 10 विकेट आणि 62 चेंडू राखून पराभव झाला होता. या सामन्यानंतर लखनौचे मालक संजीव गोयंका यांनी संघाचा कर्णधार केएल राहुल याला झापल्याचं समोर आले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. केएल राहुल कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. पण आता याबाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे. 


सनरायझर्स हैदराबादने साखळी सामन्यात लखनौचा वाईट पद्धतीने पराभव केला होता. या सामन्यानंतर गोयंका कर्णधार केएल राहुलवर चिडताना दिसले. त्यामुळे गोएंका सोशल मीडियावर ट्रोलही झाले होते. या प्रकरणानंतर राहुल संघाचे कर्णधारपद सोडू शकतो, राहुलनं लखनौचं कर्णधारपद सोडावं, अशा बातम्याही आल्या होत्या. मात्र, अद्याप असे काहीही झालेले नाही. महत्त्वाचं म्हणजे, केएल राहुल याच्याकडून याप्रकारावर कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, संजिव गोयंका यांनी केएल राहुल यांना घरी जेवणासाठी आमंत्रण केले होते. दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली.




केएल राहुल आणि लखनौचे संघमालक संजीव गोयंका यांच्यात दीर्घ चर्चा झाली असून तडजोड झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीआधी गोयंका यांनी केएल राहुल याला जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. राहुल गोयंका यांच्या घरी जेवणासाठी गेला होता. याचे फोटो समोर आले आहेत. जेवणाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.


आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सनं केएल राहुलच्या नेतृत्वात आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यामध्ये लखनौला 6 सामने जिंकता आले, तर सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. लखनौचे 12 गुण आहेत. आता त्याचे दोन सामने बाकी आहेत. लखनौचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स संघासोबत होणार आहे. यानंतर अखेरचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना 17 मे रोजी होणार आहे. दिल्लीविरोधातील सामन्यानंतर लखनौचं प्लेऑफच समीकरण स्पष्ट होईल.