T20 World Cup 2024 Semi-final : आयसीसी टी20 विश्वचषक 2024 बद्दल नवी माहिती समोर आली आहे. यंदाच्या विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. पण उपांत्य सामन्यासाठी अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. दुसरा उपांत्य सामना पावसामुळे प्रभावित झाला तर 250 मिनिट अतिरिक्त वेळ ठेवण्यात आलाय. म्हणजे पावसामुळे दुसऱ्या उपांत्य सामन्यात व्यत्यय आला तर खेळ चार तास पुढे ढकलला जाऊ शकतो. या नियमासोबतच इतरही अनेक नियामांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या टी20 विश्वचषकाचं यजमानपद वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशाकडे आहे. 20 संघामध्ये टी20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.
दोन जून 2024 पासून टी20 विश्वचषकाचा थरार सुरु होणार आहे. स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना 26 जून रोजी होणार आहे, तर दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी पार पडणार आहे. क्रिकबजच्या एका रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. जर पावसामुळे सामना प्रभावित झाला तर चार तासांपर्यंत खेळ पुढे ढकलला जाऊ शकतो. पहिल्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
पावसामुळे उपांत्य सामना रद्द झाला तर फायदा कुणाचा ?
पावसामुळे उपांत्य सामना रद्द झाला तर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला फायदा होणार आहे. सुपर 8 फेरीमध्ये सर्वात आघाडीवर असणाऱ्या संघाला फायनलचं तिकिट मिळेल. पण सामना तेव्हाच रद्द होईल, जेव्हा सामना खेळवण्याची परिस्थिती नसेल. याचा निर्णय पंच घेतील. मैदानाचा आढावा घेतल्यानंतरच सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी भारतीय वेळानुसार रात्री 8.30 वाजता सुरु होणार आहे.
पहिल्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस -
टी20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना 26 जून रोजी त्रिनिदाद येथील मैदानात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी सहा वाजता खेळवण्यात येणार आहे. पहिल्या उपांत्य सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. जर हा सामना जर पावसामुळे 26 जून रोजी होऊ शकला नाही, तर 27 जून रोजी होणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी बारबाडोस येथे होणार आहे.