Rohit Sharma : रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी अखेरचा IPL हंगाम खेळला? पुढच्या वर्षी तो नव्या संघासोबत खेळणार? यासारख्या चर्चेला पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्याला कारणही तसेच आहे. मुंबईच्या अखेरच्या साखळी सामन्यानंतर रोहित शर्माने केलेली पोस्टमुळे चर्चेला उधाण आले. चाहते संभ्रमात पडले आहेत. आयपीएल 2024 हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अतिशय खराब राहिला. मुंबईचा संघ आठ गुणांसह दहाव्या क्रमांकावरच राहिला. त्यातच रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील अंतर्गत कलहाच्या चर्चाही वाढल्या. त्यातच रोहित शर्माच्या पोस्टमुळे भलत्याच चर्चा रंगल्या. 


आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्सने अतिशय बोल्ड निर्णय घेतला. मुंबईने हार्दिक पांड्याला गुजरातकडून ट्रेड तर केलेच. पण पाच वेळच्या आयपीएल विजेता कर्णधार रोहित शर्माची कर्णधारपदावरुन हकालपट्टी केली. गुजरातमधून घेतलेल्या हार्दिक पांड्याकडे मुंबईने कर्णधारपदाची धुरा सोपवली. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांमध्ये प्रचंड संताप होता. प्रत्येक सामन्यावेळी हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यात आले. मैदानात हूटिंगही झाले. रोहित शर्माने चाहत्यांना तसं करण्यापासून रोखलं, पण चाहत्यांनी काही ऐकलं नाही. त्याच काळात रोहित शर्माने मुंबईचं कर्णधारपद सोडून दुसऱ्या संघात जावं, अशी मागणीही झाली. पंजाब, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबादसारख्या संघाचे पर्याय चाहत्यांनी रोहितला दिले. पण रोहितकडून याबाबत अधिकृत वक्तव्य आले नाही. 


रोहित शर्माच्या पोस्टची चर्चा


रविवारी रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर सहा फोटोंची एक पोस्ट केली. कॅप्शनमध्ये काहीही लिहिले नाही. फक्त एक इमोजी टाकली. रोहित शर्माच्या या पोस्टनंतर तो मुंबईची साथ सोडणार या चर्चेला वेग आला. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये याबाबतचा उच्चारही केला. एका युजर्सने म्हटले की, रोहित शर्मा मुंबईची साथ सोडणार असल्याची ही हींट आहे. तर दुसऱ्या युजर्सने म्हटले की, रोहित शर्माने संघ मालकाला इशाराच दिलाय. रोहित शर्माच्या सहा फोटोंच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहे. 



पाहा रोहितची पोस्ट - 






मुंबईचा संघ दोन गटात विभागला ?


मुंबईने हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवलं, खरं पण त्याला प्रभाव पाडता आला नाही. अंतर्गत आणि बाहेरील दबावात हार्दिकला चोख कामगिरी करता आली नाही. मुंबईचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. दुसरीकडे मुंबईचा ताफा दोन गटात विभागल्याच्या बातम्याही धडकल्या. भारतीय खेळाडू रोहित शर्माच्या बाजूने तर विदेशी खेळाडू हार्दिकच्या बाजूने असल्याच्या बातम्याही आल्या. इतकेच नाही तर रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यासारख्या खेळाडूंनी हार्दिक पांड्याच्या स्वभावाची तक्रार टीम मॅनेजमेंटकडे केल्याच्या चर्चेनेही जोर धरला. रोहित शर्मा मुंबईची साथ सोडणार, ही चर्चा सुरु आहेच. त्यात आता रोहितच्या पोस्टने आणखी भर पडली आहे.