Rishabh Pant Reaction  अहमदाबाद: दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) आयपीएलमध्ये (IPL 2024) तिसरा विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सला (Gujarat Titans ) त्यांच्या होम ग्राऊंडवर पराभूत केलं. सहा विकेट आणि 11 ओव्हर बाकी ठेवून विजय मिळवल्यानं कॅप्टन रिषभ पंत आनंदी दिसून आला. रिषभ पंतनं मॅच संदर्भात काय प्लॅनिंग केलं होतं ते सांगितलं. 


दिल्ली कॅपिटल्सची यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली सुरुवात झाली नव्हती. त्यांना सुरुवातीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. रिषभ पंतनं कमबॅक केलं तर दिल्लीला सूर सापडत नव्हता. दिल्लीनं चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करुन विजयाचं खातं उघडलं होतं. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांचा पराभव झाला. अखेर दिल्लीनं सलग दोन मॅचमध्ये विजय मिळवले आहेत. लखनौ सुपर जाएंटसचा पराभव केल्यानंतर काल गुजरात टायटन्स बरोबर दिल्लीची मॅच होती. या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं गुजरातला सहा विकेटनं पराभूत केलं. 
  
दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंत म्हणाला की, गुजरात टायटन्सला 89 धावांवर बाद केल्यानंतर जेवढ्या लवकर मॅच जिंकता येईल तितक्या लवकर जिंकण्याचा आमचा प्रयत्न होता. 


आयपीएलच्या 32 व्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा हा निर्णय ईशांत शर्मा, मुकेश कुमार आणि ट्रिस्ट स्टब्स यांनी सार्थ ठरवला, त्यांनी गुजरातला 89 धावांवर बाद केलं. यानंतर दिल्ली कॅपिटल्सनं नवव्या ओव्हरमध्येच ही धावसंख्या पार केली.  


मॅचनंतर रिषभ पंत म्हणाला की, खुश होण्यासाठी आमच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही चॅम्पियन सारखा विचार केला आणि आमच्या टीमनं आज आम्ही त्या प्रमाणं खेळू शकतो, हे दाखवून दिल्यानं खुश आहे. रिषभ पंतनं दिल्लीच्या बॉलर्सचं देखील कौतुक केलं. सध्या स्पर्धेची सुरुवात असून यामध्ये अजून सुधारणा करता येतील, असं म्हटलं.   


गुजरात टायटन्स विरुद्ध फलंदाजीला मैदानात उतरताना जेवढ्या लवकर मॅच संपवता येईल, तितक्या लवकर संपवण्याचा विचार केला होता. सुरुवातीच्या काळात आम्ही नेट रनरेटचे गुण गमावले होते, त्याची भरपाई करायची होती, असं रिषभ पंत म्हणाला. 


दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमधील विजयानंतर गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. तीन विजय आणि तीन पराजयासह दिल्ली कॅपिटल्स सहा गुणांसह सहाव्या स्थानी आहे. रिषभ पंतला त्याच्या कप्तानी आणि विकेटकीपिंगसाठी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 


संबंधित बातम्या :


आपल्याच जाळ्यात गुजरात अडकला, दिल्लीचा 6 विकेटनं मोठा विजय


टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? 6 जणांमध्ये स्पर्धा