IPL Rohit Sharma captain : रोहित शर्मा यंदाच्या आयपीएल हंगामात (IPL 2024) फक्त खेळाडू म्हणून मैदानात आहे. पण त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) शानदार कामगिरी केली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात मुंबईने पाच वेळा चषकावर नाव कोरले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वगुणाचं कौतुक सर्वजणच करतात. रोहित शर्माच्या नेतृत्वाची जरब चक्क चेन्नईच्या ताफ्यातही होती. होय.. चेन्नईचे फलंदाजी प्रशिक्षक माइक हसी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर याचीच चर्चा सुरु आहे. 


मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना आयपीएलमध्ये सर्वाधिक जास्त पाहिला जातो. या दोन्ही संघाच्या लढत नेहमीच अटीतटीची होते. कधी मुंबईचे पारडे जड तर कधी चेन्नईचे पारडे जड... पण यावेळी परिस्थिती वेगळी असेल. कारण, चेन्नईची धुरा ऋतुराज गायकवाड संभाळत आहे, तर मुंबईचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे आहे. रोहित शर्माला मुंबईने कर्णधारपदावरुन काढलं, याचा सर्वाधिक फायदा चेन्नईलाच होणार आहे. होय, माइक हसी याच्या वक्तव्यानंतर याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी हैदराबाद आणि चेन्नई यांच्यातील सामन्यादरम्यान माइक हसी यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल वक्तव्य केले आहे. याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 


माईक हसी नेमका काय म्हणाला ?


हैदराबाद आणि चेन्नई यांच्यातील सामन्यादरम्यान स्टार स्पोर्ट्सवर माइक हसी बोलत होता. यावेळी समालोचकानं माइक हसी याला एक प्रश्न विचारला. माइक हसीने दिलेल्या उत्तराची चर्चा सुरु आहे. पाहूयात नेमकं काय झालं....


प्रश्न : चेन्नई संघाला कोणत्या कर्णधाराची भीती वाटते ?  Which captain does the CSK management fear?


माइक हसी याचं उत्तर : प्रामाणिकपणे सांगायचं तर, यंदा कोणत्याही कर्णधाराची भीती नाही. फक्त एकाच कर्णधाराने आम्हाला अंतिम सामन्यात हरवलं आहे, आणि सध्या तो कर्णधार नाही. तुम्हाला माहितेय मी कुणाबद्दल बोलतोय. 


माइक हसी यानं रोहित शर्माचं स्पष्ट नाव घेतलं नाही. पण आकडेवारी अन् आयपीएलचा इतिहास पाहिला तर चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा आणि धोनी यांच्या नेतृत्वाची नेहमीच तुलना झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईने अनेकदा चेन्नईचा पराभव केला आहे. आयपीएल फायनलमध्येही रोहित शर्माच्या मुंबईने चेन्नईचा पराभव करत चषकावर नाव कोरले आहे. माइक हसी यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर रोहित शर्माचीच चर्चा सुरु आहे.