हैदराबाद : यंदाचं आयपीएल अनेक गोष्टींमुळं चर्चेत ठरत आहे. काही विदेशी खेळाडूंचा अपवाद सोडला असता भारताच्या युवा खेळाडूंनी यंदाचं आयपीएल गाजवलं आहे. या आयपीएलचं वैशिष्टय म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) या आयपीएलमध्ये कॅप्टन म्हणून खेळत नाहीत. महेंद्रसिंह धोनीनं आयपीएलच्या पहिल्या मॅचपूर्वी चेन्नईचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे दिलं. यामुळं महेंद्रसिंह धोनीचं हे शेवटचं आयपीएलं असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळं चेन्नईची मॅच ज्या मैदानात असेल तिथं त्याचं प्रेक्षकांकडून स्वागत केलं जात आहे. चेन्नईच्या प्रेक्षकांनी देखील महेंद्रसिंह धोनी फलंदाजीसाठी मैदानात कधी उतरणार याची वाट पाहिली. अखेर 20 व्या ओव्हरमध्ये महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरला त्याचं हैदराबादच्या प्रेक्षकांनी स्वागत केलं.
माही माहीचा जयघोष
महेंद्रसिंह धोनी मैदानात फलंदाजीला येतो की नाही अशी स्थिती होती. हैदराबादच्या चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता अधिक होती. महेंद्रसिंह धोनी फलंदाजीसाठी तयार झालेला होता. 20 व्या ओव्हरपूर्वी धोनीवर कॅमेरे जाताच हैदराबादमधील धोनी प्रेमी प्रेक्षकांनी माही माहीचा जयघोष केला. अखेर हैदराबादमधील धोनीच्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण झाली.
डेरिल मिशेल बाद आणि धोनी मैदानात
चेन्नई सुपर किंग्जनं सावध सुरुवात केली होती. 13 व्या ओव्हरनंतर चेन्नई सुपर किंग्जच्या महत्त्वाच्या विकेट गेल्या आणि त्यांना अपेक्षित असलेली धावसंख्या करता आली नाही. अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि डेरिल मिशेल यांनी चेन्नईचा डाव पुढं नेला. अखेर चेन्नईच्या डावाची 20 वी ओव्हर सुरु झाली. या ओव्हरमध्ये डेरिल मिशेल तिसऱ्या बॉलवर बाद झाला अन् महेंद्रसिंह धोनी मैदानावर फलंदाजीला येण्याचा मार्ग मोकळा झाला.
महेंद्रसिंह धोनी मैदानात येणार हे निश्चित होताच, मैदानावरील प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली. त्यांनी धोनीच्या नावानं घोषणाबाजी केली.प्रेक्षकांनी माही माही अशी घोषणाबाजी केली. महेंद्रसिंह धोनीनं देखील हैदराबादच्या प्रेक्षकांकडे पाहत त्यांना दाद दिली. महेंद्रसिंह धोनीला केवळ एक बॉल खेळायला मिळाला.
चेन्नईचं हैदराबादपुढं विजयासाठी 166 धावांचं आव्हान
हैदराबादनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या बॉलर्सनी सुरुवातीपासून चेन्नईच्या फलंदाजांना मोठे फटके मारु दिले नाहीत. रचिन रवींद्र 12, ऋतुराज गायकवाड 26, शिवम दुबे 45, अजिंक्य रहाणे 35 आणि रवींद्र जडेजा 31 आणि डेरिल मिशेलनं 13 धावा केल्या.
संबंधित बातम्या :
IPL 2024, CSK vs SRH : मुस्तफिजूर रहमान मायदेशी परतला, चेन्नई तरीही टेन्शन फ्री, जाणून घ्या कारण
Video: मुंबईचे सलग तीन पराभव, हार्दिक पांड्या महादेवाच्या चरणी, सोमनाथ मंदिरात पूजा