KKR vs GT, IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) यंदाच्या मोसमातही कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील सामन्यात अविस्मरणीय ठरला आहे. केकेआरचा स्टार फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh) यानं दमदार षटकार ठोकत धावांचा पाऊस पाडला. केकेआरचा फलंदाज रिंकू सिंहने शेवटच्या षटकात गुजरातच्या गोलंदाजाचा पुरत नमवलं. रिंकू सिंहने गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) याच्या षटकात पाच चेंडूत सलग पाच षटकार ठोकून कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला. रिंकूनं यश दयालविरुद्ध सलग 5 षटकार ठोकून केकेआरला विजय मिळवून दिलाच, पण साथीदाराला सर्वात मोठा झटकाही दिला आहे.


रिंकू सिंहने ज्याला 5 षटकार ठोकले, त्या गोलंदाज कोण?


आयपीएल 2023 च्या तेराव्या सामन्यात गुजरात टायटन्स संघासमोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान होतं. या सामन्यात केकेआरचा स्टार फलंदाज रिंकू सिंह सामन्याच्या शेवटच्या 5 चेंडूंवर सलग पाच षटकार ठोकून सर्वांनाच धक्का दिला. रिंकूने अशक्य ते शक्य करुन दाखवलं. या धमाकेदार खेळीमुळे रिंकू सिंह रातोरात सुपरस्टार झाला आहे. पण, यश दयालसाठीही सामना अविस्मरणीय ठरला. या सामन्यात रिंकू सिंहने मित्र यशला चांगलंच झोडपलं. या सामन्यात यशने 4 षटकात 69 धावा दिल्या आहेत.


रिंकू सिंह आणि यश दयाल दोघेही चांगले मित्र आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगले संबंध आहेत. प्रसंगी दोघेही एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसतात. अलीकडेच आयपीएल सामन्यात रिंकू सिंहच्या आरसीबी (RCB) विरुद्धच्या धडाकेबाज खेळीनंतर यशने रिंकूचं कौतुक केलं होतं. त्यानंतर दोनचं दिवसांनी रिंकूनं त्याचं मित्राला अडचणीत टाकलं आहे.


रिंकू सिंहने सलग 5 चेंडूत 5 षटकार मारल्यानंतर यश दयालही चर्चेत आला आहे. कोण आहे यश दयाल जाणून घ्या.


Who is Yash Dayal : कोण आहेत यश दयाल?


यश दयाल हा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा रहिवासी आहे. यशचे वडील चंद्रपाल हे देखील त्यांच्या काळातील चांगले वेगवान गोलंदाज होते. एवढेच नाही तर या गोलंदाजाची आयपीएल 2022 मधील शानदार कामगिरीनंतर बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघात यश दयालची निवड झाली. पण यशला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही.


Yash Dayal in IPL 2022 : गेल्या हंगामात चांगली कामगिरी


यश दयाल हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याचा आयपीएलमधील हा दुसरा हंगाम आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मेगा लिलावात त्याला गुजरात टायटन्सने 3.2 कोटी रुपयांना विकत घेतलं. यशने पदार्पणाच्या मोसमात 9 सामन्यात 11 विकेट घेतल्या. गेल्या मोसमात त्याने चांगली गोलंदाजी केली. यशसाठी आयपीएल पदार्पण दमदार ठरलं. त्यानं राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 4 षटकात 40 धावा देत तीन बळी घेतले होते. यशने शानदार खेळी करत अवघ्या 9 सामन्यांत 11 बळी घेत गेल्या मोसमात गुजरातला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 


रिंकू सिंहसोबतही चांगली मैत्री


यश आणि रिंकू निश्चितपणे आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांसाठी खेळतात, पण रिंकू आणि यश देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशच्या संघासाठी एकत्र खेळतात. रिंकू सिंह देखील यूपीच्या अलीगढ जिल्ह्यातील रहिवासी आहे. यश आणि रिंकू खूप चांगले मित्र आहेत आणि खूप दिवसांपासून एकत्र खेळत आहेत. अनेकदा हे दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.


यश दयालची क्रिकेटमधील आतापर्यंतची कामगिरी


देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीमुळे आयपीएल लिलावामध्ये मोठी रक्कम मिळाली. उत्तर प्रदेशकडून खेळताना यशने 17 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 58 विकेट घेतल्या आहेत. यापैकी यशने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 14 सामन्यात 23 विकेट घेतल्या आहेत. त्याने, टी-20 क्रिकेटमध्ये या गोलंदाजाने 33 सामन्यांमध्ये 8 च्या वर इकॉनॉमी रेटने 29 विकेट घेतल्या आहेत. पण रविवारी कोलकाताविरुद्ध यश त्याच्या कारकिर्दीतील कदाचित सर्वात खराब सामना खेळला. या गोलंदाजाने 4 षटकात एकही विकेट न घेता 69 धावा दिल्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rinku Singh IPL 2023 : कधीकाळी कोचिंग सेंटरमध्ये लादी पुसण्याचं करायचा काम, अन् एकाच षटकात ठोकले 5 षटकार... शाहरुखचा 'बेबी', केकेआरचा सुपरस्टार रिंकू सिंह कोण?