Indian Premier League 2023 : यंदा आयपीएलचा 16 व्या (IPL 2023) हंगाम आहे. यंदाच्या हंगामात धोनी (Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाची सर्वाधिक चर्चा आहे. चेन्नई (CSK) संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याच्यासाठीचं चाहत्यांचं प्रेम वेळोवेळी दिसून आलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई संघाचा सामना कोणत्याही मैदानावर असो आणि कोणत्याही मैदानात स्टेडिअममध्ये मात्र येलो आर्मी पाहायला मिळाली आहे. यावरून धोनीसाठी चाहत्यांच्या प्रेमाचा अंदाज यावरून लावता येतो.
चेन्नई संघाच्या सामन्यांना प्रेक्षकांची पसंती
चेन्नई संघ ज्या-ज्या मैदानावर सामना खेळला, तिथे संपूर्ण स्टेडियममध्ये फक्त पिवळ्या रंगाची चेन्नई संघाच्या जर्सीच दिसत होत्या. चेन्नई सुपर किंग्सचं वर्चस्व टीव्हीवर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या सामन्यांच्या प्रसारणात दिसून आलं आहे. टिव्हीवर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयपीएल सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं. यामध्ये चेन्नई संघाचे सामने सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिले आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक प्रेक्षकांनी चेन्नई संघाचे सामने पाहिले आहेत, यावरूनच धोनी आणि चेन्नई संघाची क्रेझ पाहायला मिळते. सर्वाधिक प्रेक्षक चेन्नईचे सामने पाहणं पसंत करतात.
सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिला चेन्नईचा पहिला सामना
यंदाच्या आयपीएल मोसमातील 57 लीग सामन्यांनंतर, टीव्हीवरील प्रसारणादरम्यान जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहिलेल्या टॉप-5 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या तीन सामन्यांची नोंद आहे. या मोसमातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. हा सामना सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिला असून हा सामना पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना आहे.
धोनीच्या निवृत्तीची चर्चा
दरम्यान, यंदा आयपीएलमध्ये धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. आयपीएल 2023 नंतर धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत धोनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र चाहत्यांना धोनीच्या निवृत्ती आधीचे प्रत्येक क्षण डोळ्यात साठवून ठेवायचा आहे. त्यामुळेच धोनीला पाहण्यासाठीही चाहते स्टेडिअमवर गर्दी करताना दिसत आहेत.
आयपीएल 2023 मध्ये टॉप-5 सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई विरुद्ध आरसीबी यांच्यात खेळलेला सामना आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आहे. पाचव्या क्रमांकावर मुंबई विरुद्ध आरसीबी यांच्यातील दुसरा सामना आहे.
चेन्नई सुपर किंग्स
आयपीएल गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स संघ सध्या 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईलाला शेवटच्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. जर चेन्नई संघ त्यांचा शेवटचा सामना हरला, तर त्यांना प्रार्थना करावी लागेल की मुंबई इंडियन्स, बंगळुरु आणि लखनौ यापैकी एका संघाचा त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभव व्हावा. चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा सामना 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. दिल्ली संघ सध्या प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेला असला, तरी सध्या संघ इतर संघांसाठी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.