RCB vs SRH In IPL: आयपीएल 16 चा 65 वा लीग सामना आज, गुरुवार, 18 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद येथे खेळवला जाईल. या सामन्याद्वारे, दोन्ही संघ आयपीएल 2023 चा 13 वा लीग सामना खेळणार आहेत. हा सामना जिंकून आरसीबीला प्लेऑफच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकायचं आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत किती सामने खेळले गेले आहेत आणि त्यात कोणाचा वरचष्मा आहे, हे जाणून घेऊया सविस्तर... 


बंगळुरू विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड


आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आतापर्यंत 21 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये हैदराबादनं 12 तर बंगळुरूनं 9 सामने जिंकले आहेत. एकंदरीत, हैदराबादचा आरसीबीवर वरचष्मा आहे. आज या दोन्ही संघांमध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे.


आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील आजचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. येथे दोन्ही संघांमध्ये 7 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये हैदराबादनं 6 आणि आरसीबीने केवळ 1 जिंकला आहे. अशा परिस्थितीत आरसीबी हैदराबादला त्यांच्या होम ग्राऊंडवर पराभूत करू शकते की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  


या दोघांमध्ये शेवटचा सामना आयपीएल 2022 मध्ये झाला होता. तो सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला, ज्यात आरसीबीनं 67 धावांनी विजय मिळवला. त्या सामन्यात विराट कोहली गोल्डन डकचा बळी ठरला होता, तर फाफ डू प्लेसिसनं नाबाद 73 धावा केल्या होत्या.


प्लेऑफच्या दृष्टीनं आरसीबीसाठी हा सामना महत्त्वाचा 


विशेष म्हणजे, RCB चा संघ 12 सामन्यांत 6 विजय आणि 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. हा सामना जिंकून बंगळुरूला प्लेऑफच्या आणखी जवळ जायचं आहे. RCB पुढचे दोन्ही सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते. 


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.