IPL 2023, LSG vs RCB: निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉयनिस यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर लखनौने आरसीबीचा एका विकेटने पराभव केला. एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनौने बाजी मारली. अखेरच्या षटकात लखनौला विजयासाठी पाच धावांची गरज होती. पण मात्र मार्क वूड आणि जयदेव बाद झाल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना बिश्नोई आणि आवेश यांनी लखनौला विजय मिळवून दिला. लखनौने 2013 धावांचा पाठलाग करताना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. लखनौकडून 12 षटकार आणि 17 चौकार लगावण्यात आले. निकोलस पूरन याने 19 चेंडूत 62 तर स्टॉयनिस याने 30 चेंडूत 65 धावांची खेळी केली. आरसीबीकडून मोहम्मद सिराज आणि वेन पार्नेल यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. हर्षल पटेल याला दोन विकेट मिळाल्या. 


स्टॉयनिसने सामन्याचे चित्र बदलले - 


लागोपाठ तीन विकेट पडल्यामुळे लखनौचा संघ दबावात होता. पण त्याचवेळी मार्कस स्टॉयनिस याने फटकेबाजी करत चित्र बदलले. स्टॉयनिस याने 30 चेंडूत वादळी 65 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये स्टॉयनिस याने पाच षटकार आणि सहा चौकारांचा पाऊस पाडला. स्टॉयनिसच्या फटकेबाजीमुळे लखनौच्या फलंदाजामध्ये आत्मविश्वास वाढला. 


निकोलस पूरनचे वादळ - 


मार्कस स्टॉयनिस याने चौकार षटकार लगावत लखनौच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर निकोलस पूरन याने 19 चेंडूत 62 धावांची खेळी केली. निकोलस पूरन याने 326 स्ट्राइक रेटने धावांचा पाऊस पाडला. निकोलस पूरन याने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. हर्षल पटेल आणि कर्ण शर्मा यांच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडला. निकोलस पूरन याने 19 चेंडूत सात षटकार आणि चार चौकार लगावत 62 धावांची खेळी केली. निकोलस पूरन याने यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतकाची नोंद केली. यंदाच्या हंगामात याआधी अजिंक्य रहाणे याने 20 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तर लॉर्ड शार्दुल याने 21 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याशिवाय निकोलस पूरन याने आयपीएलच्या इतिहासातील दुसरे वेगवान अर्धशतक झळकावले. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक केएल राहुलच्या नावावर आहे. राहुलने 14 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. तर युसुफ पठाण याने 15 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. निकोलस पूरन याने या यादीत स्थान मिळवले आहे.


आयुष बडोनीने इम्पॅक्ट पाडला - 


आयुष बडोनी याने संयमी फलंदाजी करत इम्पॅक्ट पाडला. आयुष बोडनी याने 24 चेंडूत 30 धावांची खेळी केली. त्याशिवाय जयदेव याने मोक्याच्या क्षणी 9 धावांचे योगदान दिलेय. 


राहुल पुन्हा फ्लॉप - 
213 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात निराशाजनक झाली. फॉर्मात असलेला काइल मायर्स खातेही न उघडता बाद झाला. मोहम्मद सिराज याने मायर्सचा त्रिफाळा उडवला. त्यानंतर केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण वेन पॉर्नेल याने लखनौला एकापाठोपाठ दोन धक्के दिले. दीपक हुड्डा 9 धावांवर बाद झाला तर कृणाल पांड्याला खातेही उघडता आले नाही. 23 धावांवर लखनौने तीन विकेट गमावले होते. त्यानंतर मार्सक्स स्टॉयनिस याने फटकेबाजी केली. पण कर्णधार केएल राहुल याला पुन्हा मोठी खेळी करता आली नाही. राहुल अवघ्या 18 धावांवर बाद झाला. यासाठी राहुलने 20 चेंडू खर्च केले. राहुल आतापर्यंत फॉर्मात दिसलेला नाही. 


दरम्यान, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांच्या तुफानी खेळीपुढे लखनौची दाणादाण उडाली. आरसीबीने निर्धारित 20 षटकात दोन गड्यांच्या मोबद्लायत 212 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी अर्धशतकी खेळी केली. लखनौकडून एकाही गोलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी शतकी भागिदारी केली.  


विराटची दमदार सुरुवात - 


लखनौविरोधात विराट कोहलीने झंझावाती खेळी करत अर्धशतक झळकावले. नाणेफेक गमावल्यानंतर विराट कोहलीने फाफ डु प्लेसिससोबत पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी केली. विराट कोहलीने 44 चेंडूत 66 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत विराट कोहलीने 4 चौकार आणि 4 षटकार लगावले. विराट कोहलीने फाफसोबत 96 धावांची सलामीची भागिदारी केली. विराट कोहलीने लखनौच्या प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेतला. विराट कोहलीने 35 चेंडूत अर्धशतक झळकावले. विराट कोहलीच्या बॅटमधून पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडला. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विराट कोहलीने दुसरे अर्धशतक झळकावले. मुंबईविरोधात नाबाद 82 धावांची खेळी केली होती. त्यानंतर कोलकात्याविरोधात तो लवकर तंबूत परतला होता. कोलकात्याविरोधात विराट कोहलीने 21 धावांची छोटेखानी खेळी केली होती. आज पुन्हा एकदा विराट कोहलीने अर्धशतक झळकावत आरसीबीच्या धावसंख्येला आकार दिला. विराट कोहलीने अर्धशतक झळकावत आरसीबीच्या धावसंख्येचा पाया रचला. आशिया कप 2022 पासून विराट कोहली पुन्हा एकदा फॉर्मात परतलाय. विराट कोहलीच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतोय. विराट कोहलीने आयपीएलच्या तीन सामन्यात 164 धावा केल्या आहेत. मुंबईविरोधात 49 चेंडूत 82 धावा केल्या होत्या. कोलकात्याविरोधात 18 चेंडूत 21 धावा चोपल्या होत्या. आज 44 चेंडूत 61 धावा चोपल्या.  



फाफ डु प्लेसिसचे अर्धशतक - 


विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी वादळी खेळी केली. विराट कोहलीनंतर फाफ डु प्लेसिस यानेही अर्धशतकी खेळी केली. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने अवघ्या 35 चेंडूत अर्धशतक झळकावले. विराट कोहली फलंदाजी करत असताना फाफ डु प्लेसिस दुसऱ्या बाजूला संयमी फलंदाजी करत होता. विराट कोहली बाद झाल्यानंतर फाफ डु प्लेसिस याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. फाफ डु प्लेसिस याने एक षटकार तर 115 मीटर लांब मारला. फाफचा षटकार पाहून मॅक्सवेलही आश्चर्यचकीत झाला होता. फाफ डु प्लेसिस याने 46 चेंडूत नाबाद 79 धावांची खेळी केली. या खेळीत फाफने पाच चौकार आणि पाच षटकार लगावले. फाफने विराट कोहलीसोबत 96 तर ग्लेन मॅक्सवेलसोबत शतकी भागिदारी केली. 


ग्लेनचा बिग शो - 


ग्लेन मॅक्सवेल याने वादळी फलंदाजी केली. मॅक्सवेल याने 29 चेंडूत 59 धावांची खेळी केली. या खेळीत मॅक्सवेल याने 6 षटकार आणि तीन चौकार लगावले. मॅक्सवेलच्या वादळी खेळीमुळे आरसीबीने 200 धावांचा पल्ला पार केला. ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांच्यासमोर लखनौची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. लखनौकडून मार्क वूड आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.