Ravichandran Ashwin Fined : फिरकीपटू अश्विन याला रोखठोक वक्तव्यामुळे ओळखले जाते. पण त्याला याच स्वभावाचा आर्थिक फटका बसला आहे. मैदानावरील पंचाच्या निर्णायाबाबत अश्विन याने पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली होती. यामुळे आर. अश्विन याला आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलकडून अश्विन याला सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावला आहे. चेन्नई आणि राजस्थान यांच्यातील सामन्यानंतर अश्विन याने प्रेस कॉन्फर्नसमध्ये पंचांच्या निर्णायावर नाराजी व्यक्त केली होती. अश्विनने आपली चूक मान्य केली आहे. आयपीएल नियमावली आर्टिकल 2.7 नुसार अश्विनने लेवल एक ची चूक केली. मॅच रेफरीने अश्विन याला समज देऊन सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावला आहे. 


नियम काय सांगतो ?
 
सार्वजनिक ठिकाणी टीका-आरोप करणे... अथवा, किंवा एखाद्या सामन्यात घडलेल्या घटनेच्या संदर्भात अयोग्य टिप्पणी किंवा कोणताही खेळाडू, संघ अधिकृत, सामना अधिकृत किंवा कोणत्याही सामन्यात भाग घेणारा संघ, अशी टीका किंवा अयोग्य टिप्पणी केली जाते. तेव्हा ही आयपीएल नियमावली 2.7 नुसार चूक असल्याचे ग्राह्य धरले जाते. अश्विन याने चेन्नईविरोधातील सामन्यानंतर पत्रकार परिषदेत पंचांच्या निर्णायावर आक्षेप घेतला होता. त्याने आपली चूक मान्य केल्यामुळे त्याच्यावर सौम्य कारवाई करण्यात आली आहे. 


पंचांनी चेंडू बदलला - 


चेपॉक मैदानावर राजस्थानने प्रथम फलंदाजी करत 175 धावा केल्या होत्या. चेन्नई संघ फलंदाजीसाठी उतरल्यानंतर दव पडले होते. त्यावेळी पंचांनी चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. राजस्थान संघाने अशी कोणताही मागणी केली नव्हती. 


अश्विन काय म्हणाला होता ? 


पंचांनी चेंडू बदलल्यानंतर अश्विन याने नाराजी व्यक्त केली. सामन्यानंतर बोलताना अश्विन म्हणाला की,  दव पडल्यानंतर पंचांनी चेंडू बदलल्यानंतर मला आश्चर्य वाटले. असे याआधी मी कधीच पाहिले नव्हते, त्यामुळे मी चकीत झालो होतो. यंदाच्या हंगामात पंचांच्या काही निर्णायांनी चकीत केलेय. काही निर्णय चांगले होते तर काही खराब होते. आमची गोलंदाजी असतानाही आम्ही चेंडू बदलण्याची विनंती केली नव्हती. पंचांनी स्वत: चेंडू बदलला. पंचांना याबाबत विचारले असता आम्ही असे करु शकतो म्हणाले.


अश्विन म्हणाला की, जेव्हा दव पडेल तेव्हा पंच चेंडू बदलतील अशी आशा आहे. या हंगामात प्रत्येकवेळी पंचांनी असेच करायला हवे. तुम्ही काहीही करा पण एक सुसत्रता असायला हवी.