IPL 2023 Points Table : आयपीएलच्या 40 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्या घरच्याच मैदानावर पराभव करत शानदार विजय मिळवला. हैदराबादने नऊ धावांनी हा सामना जिंकला. या विजयासह हैदराबादने मागील सामन्यात दिल्लीकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सनरायझर्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केलं होतं, त्यानंतर यावेळी हैदराबादने दिल्ली संघावर त्यांच्या घरच्या मैदानावर मात केली. सनरायझर्सने हा सामना जिंकून यंदाच्या आयपीएल मोसमातील तिसरा विजय मिळवला. हैदराबाद संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले असून त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. हैदराबाद संघकडे आठ सामन्यांनंतर सहा गुण झाले आहे. हैदराबाद संघाने नवव्या स्थानावरून आठव्या स्थानावर उडी घेत मुंबईला मागे टाकलं आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा हंगामातील हा सहावा पराभव आहे. त्याचे आठ सामन्यांत फक्त दोन सामने जिंकले आहे असून चार गुणांसह दिल्ली संघ शेवटच्या दहाव्या स्थानावर आहे.
पहिल्या स्थानावरील राजस्थानला गुजरातकडून धक्का
गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. शनिवारी कोलकाताविरोधातील सामना जिंकत गुजरातने सलग तिसऱ्या सामन्यात हॅटट्रिक केली. या विजयासह गुजरातने राजस्थानला झटका देत पहिलं स्थान काबीज केलं. गुजरात संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले असून त्यापैकी सहा सामन्यांत विजय मिळवला आहे. हार्दिक पांड्याचा संघ 12 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. राजस्थान रॉयल्सकडे 10 गुण आहेत. या संघाने 8 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत, तर 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ गुणतालिकेत अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाकडे प्रत्येकी 10-10 गुण आहेत.
हैदराबादने मुंबईला टाकलं मागे
सहाव्या क्रमांकावर पंजाब किंग्स संघ आहे. आठ सामन्यांपैकी चार सामने जिंकल्यानंतर पंजाबकडे 8 गुण आहेत. कोलकाता सातव्या तर हैदराबाद आठव्या क्रमांकावर आहे. कोलकाता आणि हैदराबादकडे प्रत्येकी 6-6 गुणज आहेत. कोलकाता संघाने नऊ सामन्यांपैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातील विजयासह सनराजर्स हैदराबादने मुंबई धक्का दिला आहे. मुंबई एक स्थान खाली घसरला आहे. मुंबईने सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकले तर, चार सामने गमावले आहे. हैदराबादकडून पराभवानंतर दिल्ली गुणतालिकेत सर्वात खाली दहाव्या क्रमांकावर आहे.