RCB vs SRH, IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीनं (Virat Kohli) रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन वाढवल्याचं दिसून येत आहे. आरसीबीच्या (RCB) विजयामुळे मुंबई इंडियन्स (MI) संघाचं टेन्शन वाढलं आहे. बंगळुरुने (RCB) हैदराबादविरोधातील (SRH) सामना गमावला असता तर मुंबई इंडियन्स संघाला शेवटचा सामना जिंकून (IPL 2023 Playoff) सहज प्रवेश मिळवला असता. पण, आता आरसीबीच्या विजयामुळे मुंबई इंडियन्स संघाचा प्लेऑफपर्यंत पोहोचण्याचा प्रवास काहीसा कठीण झाल्याचं दिसत आहे.
विराट कोहलीनं रोहितचं टेन्शन वाढवलं!
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. 18 मे (गुरुवारी) रोजी हैदराबादमध्ये पार पडलेल्या या सामन्यात हैदराबाद संघाने बंगळुरुला विजयासाठी 187 धावांचं लक्ष्य दिलं होतं. बंगळुरु संघानं चार चेंडू राखून लक्ष्य पूर्ण केलं. बंगळुरु संघाच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहली ठरला. त्याने शानदार शतकी खेळी केली. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आरसीबी संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी कायम आहे.
मुंबई इंडियन्स संघाची चिंता वाढली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या विजयामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाची चिंता वाढली आहे. आरसीबीने हा सामना गमावला असता तर मुंबई इंडियन्स संघाला शेवटचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये सहज प्रवेश मिळवण्याची संधी होती. पण, आरसीबीच्या विजयामुळे प्लेऑफचं समीकरण पूर्णपणे बदलून गेलं आहे. आयपीएल 2023 मध्ये आता फक्त पाच लीग सामने शिल्लक आहेत. त्यानंतर प्लेऑफचे सामने होतील.
सात संघ प्लेऑफच्या शर्यतीत
आतापर्यंत फक्त गुजरात टायटन्स संघानं प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याची प्रवास संपला आहे. उर्वरित सात संघ तीन स्थानांसाठी प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी संघांना त्यांचे उवर्रित सामने जिंकावे लागतील. शिल्लक राहिलेले सामने जिंकणारा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.
बंगळुरुच्या विजयामुळे मुंबईचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार?
बंगळुरु संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल. यासोबतच मुंबई, चेन्नई संघाने शेवटचा सामना गमावल्यास आरसीबीच्या आशा कायम राहतील. आरसीबी संघाचा नेट-रनरेट +0.180 आहे. हा नेट रनरेट मुंबई इंडियन्स संघापेक्षा चांगला आहे. मुंबईचा नेट रनरेट -0.128 आहे. जर आरसीबीने शेवटचा सामना जिंकला आणि मुंबईने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध थोड्या फरकाने विजय मिळवला, तरही आरसीबी संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो.