IPL 2023 Award Winners List : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या मोसमातील (IPL 2023) अंतिम सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली. गतविजेत्या गुजरात टायटन्सवर मात करत चेन्नई सुपर किंग्सनं पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. गुजरातने अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली पण, चेन्नईचे खेळाडूं टायटन्सवर भारी पडले. गुजरात टायटन्सला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 


ऑरेंज आणि पर्पल कॅप गुजरातकडे


आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा पर्पल कॅप दिली जाते. यंदाच्या मोसमात ऑरेंज आणि पर्पल कॅप गुजरात टायटन्स संघाकडे गेली. गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने 2023 आयपीएलच्या यंदाच्या सोळाव्या मोसमात (IPL 2023) च्या सर्वाधिक धावा केल्या. आयपीएल 2023 मध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी शुभमन गिल ठरला. शुभमन गिलने 17 सामन्यात 890 धावा केल्या. 


त्याशिवाय गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पर्पल कॅप जिंकली. मोहम्मद शमीने 17 सामन्यात सर्वाधिक 28 विकेट घेतल्या आहेत. तर गुजरात टायटन्सच्या मोहित शर्मा आणि राशिद खानने प्रत्येकी 27-27 विकेट घेतल्या. यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सच्या पियुष चावलाने 22 विकेट घेतल्या.


आयपीएल विजेत्या संघाला किती बक्षिस मिळाले?


चेन्नई सुपर किंग्स संघाने महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील सलग पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावलं. आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्सला 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले.


अंतिम फेरीत हरलेल्या संघाला किती बक्षिस मिळालं?


अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघालाही अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर मोठी रक्कम बक्षिस म्हणून मिळाली. उपविजेत्या गुजरात टायटन्सला 13 कोटी रुपये मिळाले.


ऑरेंज कॅप विजेत्या खेळाडूला किती रुपये मिळाले?


ऑरेंज कॅप विजेता गुजरात टायटन्सचा खेळाडू शुभमन गिलला 15 लाख रुपये बक्षिस मिळालं.


पर्पल कॅप विजेत्याला किती रक्कम बक्षीस मिळाली?


गुजरात टायटन्सच्या पर्पल कॅप विजेत्या मोहम्मद शमीला बक्षीस म्हणून 15 लाख रुपये मिळाले.


चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 चं विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियनशिप मिळवली. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स प्रमाणे सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकणारा संघ ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.