Mumbai Indians Punish Nehal Wadhera: मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये फॉर्मात आहे. पॉईंट टेबलमध्ये संघ सध्या तिसऱ्या स्थानी असून आज लखनौशी भिडणार आहे. मुंबई आपला सीझनमधील 13वा सामना लखनौमधील एकाना स्टेडियमवर खेळणार आहे. मुंबईनं त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीप्रमाणेच, आपल्या खेळाडूंना शिस्त शिकवण्याचा एक चांगला आणि अतिशय गमतीशीर मार्ग स्वीकारला आहे. मुंबईनं अलिकडेच संघाचा स्टार फलंदाज नेहल वढेरा (Nehal Wadhera) याला विमानतळावर क्रिकेट पॅड बांधायला लावले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तशी शिक्षाच नेहलला सुनावण्यात आली होती. 


आता सर्वांना प्रश्न पडलाय की, नेहलला ही शिक्षा का सुनावली? मुंबई इंडियन्सनं आपल्या स्टार फलंदाजाला टीम मिटिंगला उशीर पोहोचल्यामुळे शिक्षा दिली. खरं तर, नेहल वढेरा मुंबईच्या फलंदाजांच्या मिटिंगला उशीरा आला, ज्यामुळे त्याला मुंबई विमानतळावर क्रिकेट पॅड बांधून चालण्याची शिक्षा दिली गेली. मुंबईच्या सोशल मीडियावर नेहलचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये तो क्रिकेट पॅड बांधून विमानतळावर फिरताना दिसत होता. सगळे निहाल वढेराकडे बघत होते. विमानतळावर असणाऱ्या अनेकांना नेहलचं काय चालूये काही कळत नव्हतं, पण संघातील इतर खेळाडू मात्र नेहलची खिल्ली उडवत होते. 




मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नेहलचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू नेहल वढेरानं मुंबई विमानतळावर त्याच्या ओओटीडीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तो क्रिकेट पॅड्स घालून विमानतळावर दिसून आला. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहलला फलंदाजांच्या मिटिंगला उशीर झाल्याबाबत वाईट वाटतंय."






चाहत्यांच्या प्रतिक्रिया... 


मुंबईनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या व्हिडीओला अडीच हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी कमेंटमध्ये आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरनं लिहिलंय की, मुलावर काय अत्याचार होत आहेत. दुसर्‍यानं लिहिलं की, "हेल्दी पनिश्मेंट"


आतापर्यंत फॉर्मात आहे नेहल वढेरा 


नेहलनं आतापर्यंत आयपीएल 16 मध्ये मुंबईसाठी जोरदार फलंदाजी केली आहे. त्यानं संघासाठी एकूण 10 सामने खेळले आहेत, 7 डावात फलंदाजी करत 33 च्या सरासरीनं आणि 151.15 च्या स्ट्राईक रेटनं 198 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतकं झळकली आहेत.