MI vs RR, IPL's 1000th Match : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चा 1000 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात खेळला गेला. अतिशय रोमांचक झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा शेवटच्या षटकात 6 गडी राखून पराभव केला. शेवटच्या षटकात मुंबईला 17 धावांची गरज होती, यावेळी टीम डेव्हिडने 3 चेंडू आधी जेसन होल्डरला सलग 3 षटकार ठोकून मुंबईला सामना जिंकून दिला. यशस्वी जैस्वालने आयपीएल कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं, संदीप शर्माने सूर्यकुमार यादवचा डायव्हिंग झेल घेतला आणि रोहित शर्मा त्याच्या 36 व्या वाढदिवशी 3 धावांवर बोल्ड केलं.


आयपीएलच्या इतिहासातील हा 1000 वा सामना


इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील हा 1000 वा सामना होता. आयपीएल टी20 लीग 2008 पासून खेळवली जात आहे. या लीगमुळे अनेक खेळाडूंना टीम इंडियासाठी खेळण्यासाठी दारंही उघडली आहेत.  मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर रविवारी (20 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील चौथ्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग मुंबई संघाने केला.


यशस्वी जैस्वालचं आयपीएलमधील पहिलं शतक 


मुंबई विरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या 21 वर्षीय यशस्वी जैस्वालनं शानदार शतकी खेळी केली. यशस्वीने आयपीएल कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. त्यानं पहिल्या चेंडूपासूनच स्फोटक फलंदाजी केली. यशस्वीने 62 चेंडून 124 धावांची खेळी करत त्याच्या बॅटची ताकद दाखवून दिली. यासोबतच यशस्वीने यंदाच्या आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्याही नोंदवली आहे. कधीकाळी मुंबईमध्ये पाणीपुरी विकणाऱ्या या खेळाडूच्या मेहनत आणि जिद्दीचं सर्वत्र कौतुक होतं आहे. 


संदीप शर्मानं घेतला सूर्यकुमार यादवचा डायव्हिंग झेल


मुंबई संघाकडून सुर्यकुमार यादव दमदार फलंदाजी करताना दिसत होता. मात्र, मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात सुर्या झेलबाद झाला. राजस्थान रॉयल्सच्या संदीप शर्मानं सुर्यकुमार यादवला शानदार डायव्हिंग झेल घेत, त्याला तंबूत माघारी धाडलं. त्यानं झेल घेण्यासाठी 19 मीटर अंतर उलट दिशेने धावत जात डॅशिंग झेल घेतला. सुर्यकुमार यादवचा झेल घेणाऱ्या संदीप शर्माचं सर्वत्र कौतुक होतं आहे. या दमदार कॅचचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


रोहित शर्मा तीन धावांवर बोल्ड


मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने याला त्याच्या वाढदिवसा दिवशी (30 एप्रिल) बोल्ड करत केवळ तीन धावांवर तंबूत परतावं लागलं. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला त्याच्या वाढदिवशी काही विशेष कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावातील दुसऱ्याच षटकात राजस्थानच्या संदीप शर्माने त्याला स्लोअर चेंडूवर बोल्ड केलं. रोहितला फक्त तीन धावा करता आल्या.


टीम डेव्हिडचे सलग तीन षटकार


सोळाव्या षटकात सुर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर मुंबईला शेवटच्या 4 षटकांत 57 धावांची गरज होती. सूर्यानंतर फलंदाजीला आलेल्या टीम डेव्हिडने शानदार फलंदाजी करत मोठे फटके मारले. त्यानंतर मुंबईला शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. राजस्थानच्या जेसन होल्डरने 3 फुल टॉस चेंडू टाकले, यावर डेव्हिडने सलग तिन्ही षटकार मारून संघाला तीन चेंडू राखून सहा विकेटने विजय मिळवून दिला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


MI vs RR, IPL 2023 : मुंबई इंडियन्सची ऐतिहासिक कामगिरी, वानखेडे स्टेडिअमवर रचला नवा विक्रम